राज्यात 70-75 टक्के मतदान

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान यंत्र बंद पडणे, वादावादीच्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता शांततेत 70 ते 75 टक्के इतके भरघोस मतदान झाले. सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये लहान मुलांना मतदान यंत्रापर्यंत जाऊ देण्यात आल्याच्या घटनेची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत सबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होणार आहे.

राज्यातील 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यामध्ये शनिवारी मतदान पार पडले. महापालिकांच्या तुलनेत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सकाळपासूनच अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. रत्नागिरी जिह्यातील चिपळूण तालुक्यात काही ठिकाणी मतदान यंत्र(ईव्हीएम) बंद पडण्याच्या घटना घडल्या. आणखी काही जिह्यात मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. मात्र, मतदान यंत्र दुरुस्त करून लगेच मतदान सुरु करण्यात आले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत 12 जिह्यात सुमारे 70 ते 75 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, कोल्हापूर जिल्हयात सर्वाधिक 80 टक्केच्या पुढे मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपली असली तरी त्यावेळीही काही मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा होत्या. त्यामुळे मतदानाची अंतिम ठक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. या सर्व ठिकाणी सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार असून दोन तासात निकालाचे चित्र स्पष्ट होईल.

Exit mobile version