भिकाऱ्यांवर दगडफेक करत घुसला घरात
| रायगड | खास प्रतिनिधी |
अलिबाग शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. एका मनोरुग्णाने मारुती मंदिरासमोरील भिकाऱ्यांवर दगडफेक केली आणि महावीर मंदिरासमोरील एका घरामध्ये तो मनोरुग्ण घुसला. त्यामुळे अचानक घडलेल्या या प्रकाराने त्या घरातील सर्व व्यक्ती घाबरून गेले. काही तरुणांनी प्रसंगावधान दाखवत त्या मनोरुग्णाला घराबाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्याला कर्जत येथील मनोरुग्णालयात पाठवण्यात आले. सदरचा प्रकार शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली होती.
शनिवार असल्याने मारुती मंदिरासमोरील रस्त्यावर नेहमीप्रमाणे काही भिकारी भिक्षा मागण्यासाठी बसले होते. त्यावेळी एक मनोरुग्ण तेथे आला. त्याने शेजारील एका दुकानातून कोकम सरबतचा कॅन चोरून आणला आणि भिक्षा मागणाऱ्या भिकाऱ्यांवरती ओतला. त्यामुळे संतप्त झालेल्या भिकाऱ्यांनी त्याला हटकले मात्र तो असे वारंवार करत असल्याने त्यांनी त्याला हुसकावून लावत त्याचा पाठलाग केला तर रागावलेल्या मनोरुग्णाने सदरच्या भिकाऱ्यांवरती दगडफेक केली. त्यामुळे भिकारी मागे फिरले. या प्रकाराने नागरिक घाबरून गेले होते. मनोरुग्णाने महावीर मंदिरासमोरील वसंत जोशी सरांच्या घरात थेट प्रवेश केला. त्याच्या हातामध्ये स्क्रू ड्रायव्हर होता. घरातील व्यक्ती अचानक घडलेल्या प्रसंगाने घाबरून गेले.
मनोरुग्ण घरातील सोफ्यावर बसला. एका पेपरने हात पुसले आणि घरातील व्यक्तींना पंखा चालू करा मला अतिशय गरम होत आहे. एकाने थंड पाणी आणा असे आदेश दिले. त्याचवेळी कुटुंबातील एका व्यक्तीचा मोबाईल त्याने मागितला मोबाईल वरती नंबर डायल करून मी गजा बोलतो आहे, मला ओळखलं का ? असं तो बोलू लागला त्यानंतर शहरातील तरुण राहुल साष्टे, माजी नगरसेवक अनिल चोपडा आनंद, आशिष जैन यांच्यासह काही तरुण तेथे जमा झाले. त्यांनी तातडीने त्या मनोरुग्णाला घराबाहेर काढले. परंतु तो ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने त्याच्या हात पाय बांधले आणि त्यानंतर एका रिक्षात बसवून त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात येत होत. त्यावेळी त्या मनो रुग्णाने धावत्या रिक्षा मधून उडी घेतली. तोपर्यंत पोलीस तिथे आले आणि चोपडा याने रुग्णवाहिकेला पाचारण केले. साहेब मला जुलीने फसवले मी वेडा नाही असे तो मनोरुग्ण बोलत होता. बऱ्याच परिश्रमानंतर रुग्णवाहिकेमध्ये त्या मनोरुग्णाला बसवले त्याच्यासोबत दोन पोलीस शिपाई देखील होते. त्याला कर्जत येथील रुग्णांसाठी काम करणाऱ्या श्रद्धा फाउंडेशन येथे नेण्यात आल्याचे तरुणांनानी सांगितले.
दरम्यान, शहरामध्ये अचानकपणे असे मनोरुग्ण येतात तरी कसे, यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. अशा मनोरुग्णांकडून नागरिकांवरती हल्ला झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहे.