सेमीफायनलमध्ये प्रवेश
। हांग् चौऊ । वृत्तसंस्था ।
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. उप उपांत्य सामन्यात भारताने नेपाळचा 23 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फंलदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 202 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर नेपाळला 179 धावांमध्ये रोखले. भारताकडून यशस्वी जयस्वाल याने शतकी खेळी केली. तर गोलंदाजीत रवि बिश्नोई याने तीन विकेट घेतल्या.
यशस्वीने 49 चेंडूत 100 धावांची खेळी केली, त्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 202 धावा केल्या, परंतु नेपाळच्या फलंदाजांनी या धावा भारताला कमी पडतील अशी शक्यता निर्माण केली होती. शेवटी अवघ्या 23 धावांनी त्यांचा पराभव झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुख्य भारतीय संघाविरुद्ध अडीचशे धावा करणारा नेपाळ संघ सहजासहजी हार मानणार नाही हे उघड होते. आज भारतीयांनी त्यांच्या एकाही फलंदाजाला अधिक काळ मैदानावर टिकू दिले नाही; अन्यथा द्विशतकी आव्हान पार करणे त्यांना कठीण गेले नसते.
सीमारेषा फार लांब नसलेल्या आणि पूर्ण गोलाकार नसलेल्या मैदानावर नेपाळच्या फलंदाजांनी भारतीयांच्या तुलनेत अधिक म्हणजेच 14 षटकार मारले; तर भारतीयांना 12 चेंडूत सीमारेषेवरून मारता आले. ही आकडेवारी प्रशिक्षक व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्यासाठी चिंता वाढवणारी आहे. यशस्वी एका बाजूने दिमाखदार शतकी खेळी सजवत असताना दुसऱ्या बाजूने ऋतुराज, तिलक वर्मा, जितेश शर्मा अपयशी ठरले, त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारणे कठीण जाणार असे वाटत असताना शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांनी अखेरच्या षटकांत तडाखेबंद फलंदाजी केली.
भारत 20 षटकांत 4 बाद 202 यशस्वी जयस्वाल 100- 49 चेंडू (8 चौकार, 7 षटकार), ऋतुराज गायकवाड 25, तिलक वर्मा 2, जितेश शर्मा 5, शिवम दुबे नाबाद 25-19 चेंडू (2 चौकार, 1 षटकार), रिंकू सिंग नाबाद 37-15 चेंडू (2 चौकार, 4 षटकार), दीपेंद्र सिंग 31-2. नेपाळ 20 षटकांत 9 बाद 179 कुशल भूर्तेल 28, कुशल मल्ला 29, दीपेंद्रसिंग ऐरी 32-15 चेंडू (4 षटकार), सुंदीप जोरा 29-12 चेंडू (1 चौकार, 3 षटकार). (अर्शदीपसिंग 43-2, आवेश खान 32-3, रवी बिश्नोई 24-3)







