रॉयल्टी न भरल्यामुळे कारवाई
| पनवेल | वार्ताहर |
महसूल विभागाने केलेल्या कारवाईत रॉयल्टी न भरता मालवाहतूक करणारी 18 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पनवेलसह परिसरातील विविध महामार्ग आणि शहराअंतर्गत मार्गावर पनवेलच्या महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी ही कारवाई केली.
ही वाहने सोडविण्यासाठी डम्पर मालकांना एका वाहनासाठी 1 लाख 70 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. खदानींवर अप्रत्यक्ष ताबा मिळविण्यासाठी एका कंपनीने पुढाकार घेतला होता. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेनेचे आदित्य ठाकरे तसेच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत विविध तक्रारी करण्यात आल्या आहेत. पनवेल आणि उरण तालुक्यांमधील खदानींमधून उत्खनन होऊन निघणाऱ्या दगड व खडीवर कोणाचे नियंत्रण या मुद्द्यावर सर्वत्र चर्चा झाली.
पनवेल परिसरात 80 खदानी आहेत. कार्यवाहीसाठी मागील आठवड्यात मंडळ अधिकारी व कर्मचारी नेमले आहेत. पनवेलचे तत्कालीन तहसीलदार विजय तळेकर यांनी या खदानी मालकांकडून मागील अनेक वर्षे न भरलेल्या महसुलावर कार्यवाही केल्यानंतर 100 कोटी रुपयांचा महसुल खदानी मालकांनी भरला. मात्र, अजूनही अनेक खदानी बेकायदा सुरु आहेत. पनवेलचे प्रांत अधिकारी राहुल मुंडके आणि पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांनी रात्री कारवाई केली आहे. महसुलाच्या पावत्या खातरजमा करण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही महसूल विभाग या पुढे सुरूच ठेवणार, अशी माहिती पनवेलचे प्रांत अधिकारी मुंडके यांनी दिली.