इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत
| चिरनेर | वार्ताहर |
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांच्या कारभाराला कंटाळून चिरनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला. या नवनिर्वाचित कार्यकर्त्यांच्या हाताला शिवबंधन बांधून व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार मनोहर भोईर यांनी शिवसेना पक्षातर्फे या नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
चिरनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उरण तालुका युवक संघटनेचे उपाध्यक्ष निलेश ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे उरण तालुका उपाध्यक्ष मिलिंद ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिरनेर गाव अध्यक्ष अमर ठाकूर यांच्यासह ठाकूर परिवारातील अनेक महिला पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. गेल्या अनेक वर्षापासून या महिला पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम केले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची मोठी निराशा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी या कार्यकर्त्यांना कधी विश्वासात घेतलेच नाही. चिरनेर गावात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी, तरी त्यांची साधी विचारपूस तरी करायला हवी होती. ती स्थानिक वरिष्ठ नेत्यांकडून केली गेली नाही. या गलथान व मनमानी कारभाराला कंटाळून अमर ठाकूर, निलेश ठाकूर, मिलिंद ठाकूर यांच्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
माजी आमदार मनोहर भोईर, शिवसेना उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर मोकल, शेकापचे सुरेश पाटील, काँग्रेसचे अलंकार परदेशी चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किरण कुंभार यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.