| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात असलेल्या आदिवासी भागातील रस्ते वन जमिनीतून जात असल्याने तेथे पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे दरवर्षी त्या भागातील आदिवासी लोकांना श्रमदान करून चालण्यायोग्य रस्ते बनवावे लागतात. यावर्षी देखील स्थानिक आदिवासी लोकांनी श्रमदान करून रस्ते बनविण्यासाठी लोकसहभाग दाखवला. या रस्त्याचे डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण व्हावे अशी अनेक वर्षे या भागातील आदिवासी लोकांची मागणी असून देखील शासन यांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.
माथेरान डोंगरात 12 आदिवासी वाड्या असून त्यात आसल, माणगावतर्फे वरेडी, उमरोली आणि किरवली या चार ग्रामपंचायतमध्ये या आदिवासी वाड्या अंतर्भूत आहेत. त्या आदिवासी वाडयांना जाणारा रस्ता हा वन जमिनीतून जात असल्याने तेथे शासनाला डांबरी रस्ते बनविता येत नाहीत. मात्र वन हक्क कायद्यानुसार स्थानिक आदिवासी लोकांनी आपला वहिवाट असलेली जमीन आपल्या नावे झाल्यानंतर रस्त्यासाठी देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कामे या भागात केली जात नाहीत. त्यामुळे माथेरानचे डोंगरात असलेल्या आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थ हे दरवर्षी पावसाळा संपला कि रस्त्याची दुरुस्ती करायला लागतात. त्यासाठी यावर्षी दिवाळी सणाच्या आधी रस्त्याच्या श्रमदान करण्यासाठी बेकरेवाडी येथील स्थानिक आदिवासी यांनी तीन दिवस श्रमदान करन तब्बल दोन किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला.
आमच्या वाडीमधील सर्व जण मोलमजुरी करण्यासाठी सकाळी बाहेर पडतात आणि सायंकाळी घरी परततात. त्यामुळे हातावर पोट असलेले आम्ही सर्व रोजगार बुडवून तीन दिवस श्रमदान करून रस्ता बनविला. शासनाने आमच्या वाडीत कर्यत रस्त्याचे डांबरीकरण करुन द्यावे.
गणेश पारधी, आदिवासी ग्रामस्थ






