सुरक्षेत वाढ करण्याची मागणी
| मुंबई | वृत्तसंस्था |
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच जोर धरत असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मोबाईलवर धमकी आल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात स्वतः विजय वडेट्टीवार यांनी धमकी आल्याची बाब राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवली आहे. सध्या विजय वडेट्टीवार यांना वाय प्लस सुरक्षा असून त्यात तीन जवान आणि एक गाडी अशी सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र, सुरक्षिततेच्या कारणामुळे त्यात आणखी वाढ करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्याविषयी काही विधानं केली होती. त्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. याद्वारे ते मराठा तरुणांची दिशाभूल करत आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं. यानंतर त्यांना धमक्या आल्या आहेत. पण धमक्या देणारे अज्ञात आहेत त्यांची माहिती आपल्याला नाही असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.