| पनवेल | प्रतिनिधी |
खारघरच्या मेट्रीक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अकाऊंट विभागात काम करणाऱ्या एका महिलेने सव्वाआठ लाखांची रक्कम परस्पर वळती केली आहे. या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
खारघर सेक्टर-5 मध्ये मेट्रीक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉ. आचारी हे मेडीकल डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. या रुग्णालयाच्या जानेवारी 2022 अकाऊंट विभागात या महिलेची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या विमा संबंधित कामे पाहण्याची जबाबदारी होती. एप्रिल महिन्यामध्ये डॉ.आचारी यांनी अकाऊंट विभागाकडे एका रुग्णाच्या बिलाच्या रक्कमेची मागणी केली होती. मात्र, हे बिल भरण्यात आल्याचे डॉक्टरांना सांगण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांनी इतर कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्या महिलेने रुग्णाचे पैसे पती व मैत्रीण यांच्या बँक खात्यात वळते केल्याची माहिती डॉक्टरांना मिळाली. नोव्हेंबर 2022 ते एप्रिल 2023 या कालावधीत तब्बल 14 लाख 9 हजार रुपये रक्कमेचा अशाच प्रकारचा अपहार केल्याचे आढळून आले. त्यामुळे हॉस्पिटलने त्या महिलेविरोधात खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.