विजय वडेट्टीवार यांची टीका
। मुंबई । प्रतिनिधी ।
गिरीश महाजन यांच्याकडे दूध, दही आणि लोणी खूप आहे. त्यामुळे जिथे गरज पडली तिथे ते लोण्याचे कटोरी घेऊन जातात. आणि जेवढे लोणी लावता येईल, तेवढे लोणी लावतात. या माध्यमातून ते समोरच्याची नाराजी दूर करतात. त्यांच्याकडे एवढेच काम उरले आहे, त्यांच्याकडे लोण्याने भरलेली मडके आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली. यावरुन विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ हे निवडणुकीसाठी इच्छुक होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला होता. मात्र महायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला न सोडता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटली. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्यावतीने हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांचे वक्तव्य देखील तसेच संकेत देत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावर आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.