| कोलकाता | वृत्तसंस्था |
राहुल द्रविडनंतर भारतीय संघाचा हेड कोच कोण होणार, याबाबत जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात होत आहे. आयपीएलदरम्यान अनेक नावं भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी चर्चेत होती. अखेर ही चर्चा कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीरवर येऊन स्थिरावताना दिसत आहे. बीसीसीआयने देखील गंभीरचं नाव निश्चित केल्याची चर्चा आहे. मात्र, याचवेळी बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने एक सोशल मीडिया पोस्ट करत खळबळ उडवून दिली. त्याने एखाद्या खेळाडूच्या आयुष्यात कोचचा काय रोल असतो याबद्दल या पोस्टमध्ये लिहिले आहे.
सौरव गांगुलीने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली की, एखाद्या कोचचे खेळाडूच्या आयुष्यात खूप मोठे महत्व असते. त्याचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव करून घेण्याने एखाद्याचे मैदानावरील अन् मैदानाबाहेरील आयुष्य आणि भविष्य घडते. त्यामुळे कोच आणि संस्थेची योग्य निवड करणे खूप गरजेचे असते. दरम्यान, आयपीएलच्या 2011 च्या हंगामात कोलकाताने सैरव गांगुलीऐवजी गौतम गंभीरकडे नेतृत्व दिले होते. मात्र, त्यानंतर गंभीर अन् गांगुलीमध्ये कोणते वितुष्ट आल्याचे ऐकण्यात आले नव्हते. परंतु, आता गांगुलीचे हे ट्विट एकप्रकारे बीसीसीआयला वॉर्निंग असल्याचे जाणकार म्हणत आहेत.







