| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यात शनिवारी ( दि.8) दुपारपासून वादळी पावसाने सुरुवात केली. या पावसाचा फटका मुंबई-गोवा महामार्गाला बसला आहे. मुसळधार पावसाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगाव गावाजवळील दरड सायंकाळी सव्वा सहानंतर कोसळली. या नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवित हानी झाली नसली तरी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
या घटनेची माहिती समजताच आपत्ती विभाग, राष्ट्रीय महामार्ग, महाड नगरपालिका व स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने महामार्गावर आलेली दरड बाजूला काढण्याचे यशस्वी प्रयत्न या यंत्रणेने केले. दरड कोळल्याने झालेल्या वाहतूक कोंडीचा मार्ग तातडीने बदलण्यात आला. या मार्गावरील वाहतूक शेजारी असलेल्या मार्गावरून वळविण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली. सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली असून या ठिकाणी आवश्यक असलेली यंत्रणा कार्यान्वित राहणार असल्याचे राष्ट्रीय महामार्गाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, दोन दिवस महाड शहर व परिसरामध्ये दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात केली आहे. आज दुपारी दोन वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस सायंकाळपर्यंत सुरू होता.