| अलिबाग | वार्ताहर |
एसओएस-बालग्राम चळवळीचे जनक दिवंगत डॉ. हर्मन मायनर यांची जयंती रविवारी, (दि.23) जून रोजी सोगाव, अलिबाग, जि. रायगड येथील बालग्राममध्ये अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. डॉ. हर्मन मायनर यांच्या प्रेरणेने जगातील सर्व देशांत एसओएस-बालग्राम सुरू झाले. त्यामध्ये कुटुंबांपासून वंचित, अठरा वर्षापर्यंतच्या मुलामुलींना आईचे प्रेम लाभते आणि भावंडांचा सहवास मिळतो, जवळच्या शाळांत शिक्षणही घेता येते. त्यानंतरही शिक्षण, रोजगारासाठी या सेवाभावी संस्थेद्वारे मदत केली जाते. डॉ. मायनर यांच्या प्रेरणेने भारतात 1964 पासून बालग्रामे सुरू झाली.
गेल्या साठ वर्षात भारतातील विविध राज्यांत एकूण 31 बालग्रामे कार्यरत असून, त्यामध्ये 65 हजारांपेक्षा जास्त मुलामुलींना दरवर्षी सुरक्षित आसरा लाभत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शाम जोगळेकर होते. त्यांनी डॉ. हार्मन मायनर यांच्या विलक्षण जीवन आणि कार्याविषयी सांगितले. मुलांच्या वाढीच्या काळात आई आणि भावंडांचा सहवास महत्त्वाचा असतो. व्यक्तिमत्त्व विकासातील कुटुंब आणि अन्य घटकांचे महत्त्व त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला बालकल्याण विभाग, रायगडचे परिवीक्षा अधिकारी योगीराज जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवातीला डॉ. हर्मन यांच्या अर्धपुतळ्याला सर्वांनी वंदन केले.
या कार्यक्रमाला दिलीप पाटील, सुहास गानू, शिवाजी वाघमोडे आणि काही ग्रामस्थ आणि अन्य हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी मान्यवरांच्या हस्ते शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील यशस्वी मुलामुलींना बक्षिसे देण्यात आली. त्यानंतर तेथील मुलामुलींनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केला. नृत्य, संगीत, काव्य गायन यामुळे हा कार्यक्रम उत्तम रंगला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार ग्रामप्रमुख सुजय बाजपाई यांनी केले.







