81 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार
| रायगड | खास प्रतिनिधी |
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रायगड जिल्ह्यातील 81 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तब्बल 54 हजार 208 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 486 अधिकार, कर्मचारी मतदान केंद्रावर तैनात केले आहेत. 1 जुलै 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.
कोकणात खरी लढत ही महाविकास आघाडीचे रमेश किर आणि भाजपाचे निरंजन डावखरे यांच्यामध्येच होणार आहे. महाविकास आघाडीने सर्वाधिक पदवीधर मतदारांची नोंदणी केली आहे. जिल्ह्यात 54 हजार 208 मतदार आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघात 5 हजार 291 पदवीधर मतदारांची संख्या आहे. पेण विधानसभा मतदारसंघात 6 हजार 704, पनवेल विधानसभा मतदार संघात 20 हजार 71, उरण विधानसभा मतदारसंघात 3 हजार 825, कर्जत विधानसभा मतदारसंघात 6 हजार 646, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात 7 हजार 737, महाड विधानसभा मतदारसंघात 3 हजार 934 अशा एकूण 54 हजार 208 पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. यात पुरुष मतदार 30 हजार 843, महिला मतदार 23 हजार 356 आणि तृतीय पंथी पदवीधर मतदार 9 आहेत. सर्वाधिक मतदार पनवेल तालुक्यात असून, त्यांची संख्या 20 हजार 71 इतकी आहे.
मतदान शांत, निर्भय व निःपक्षपाती वातावरणात पार पाडावे याकरिता कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील रबाळे, एपीएमसी, खांदेश्वर व उरण या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 मतदान केंद्र (इमारत) च्या ठिकाणी असलेल्या एकूण 47 बूथवर कलम 144 (1) कलम जारी केले आहे. हा आदेश कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील रबाळे, एपीएमसी, खांदेश्वर व उरण पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रामध्ये 26 जून रोजी 00.01 वा. पासून ते 26 जून रोजीचे 24.00 वा.पर्यंत अंमलात राहील.
प्रशासन सज्ज या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 81 मतदान केंद्रावर 81 मतदान अधिकारी, 243 सहाय्यक मतदान अधिकारी, 81 शिपाई, 81 पोलीस कर्मचारी असे एकूण 486 अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडणार आहेत.







