मुंबई-गोवा महामार्गावरील डागडुजी संथगतीने; लोकप्रतिनिधींचा ही कानावर हात
। रायगड । प्रतिनिधी ।
वर्षभरात पूर्ण होईल, दीड वर्षात पूर्ण होईल, असे उत्तरे देणार्या कोकणातील लोकप्रतिनिधींचीही मुंबई-गोवा महामार्गावर प्रतिक्रिया देण्यास हिंमत होत नाही. गतवर्षी गौरी-गणपतीनिमित्त दिलेली डेडलाईन हुकली आहे, मात्र ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तीन वेळा मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्ततेच्या डेडलाईन हुकल्या आहेत.पळस्पे ते इंदापूर या पहिल्या 84 किलोमीटरच्या टप्प्यातील 40 टक्के पेक्षा जास्त कामे शिल्लक आहेत. नागोठणे, कोलाड या ठिकाणी वाहने चालवण्यासाठी रस्ताच नाही. माणगाव, इंदापूर येथे गतवर्षी केलेल्या डांबरीकरणावर पेव्हर ब्लॉकची मलमपट्टी केली जात आहे. गणेशोत्सवाला काही दिवसच उरले असल्याने मलमपट्टीच्या कामाचा वेग पाहता, यंदाही चाकरमान्यांचा प्रवास खडतर होणार असल्याचे दिसत आहे.
गतवर्षी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी, मुंबई-गोवा महामार्गाचा विषय गंभीरपणे घेतला होता. गणेशोत्सवापूर्वी 42 किलोमीटरच्या पळस्पे ते कासू या टप्प्याच्या काँक्रिटीकरणाला अद्ययावत यंत्रसामग्री वापरून जोरदार सुरुवात झाली होती. चव्हाण यांनी चार वेळा महामार्ग विकास प्राधिकरणाचे अधिकारी, मुंबईतील प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन दौरा केला. खूप गाजावाजा करत सुरुवात झालेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा वेग पाहता, काही दिवसांत रायगड जिल्हा हद्दीतील काँक्रिटीकरण पूर्ण होईल, असे सांगितले जात होते, तर पळस्पे ते कासू दरम्यान एक मार्गिका सुरू करण्याची ग्वाही बांधकाम मंत्र्यांनी दिली होती. परंतु गणेश विसर्जनानंतर कामाचा वेग मंदावला तो आजतागायत कायम आहे. पुलांवरील गर्डर टाकण्याचे काम, त्यांचे जोडरस्ते या सारखी रखडलेली कामे पाहता, तीन वर्षे तरी रायगडच्या हद्दीतील काम पूर्ण होणार नाही, अशी प्रतिक्रिया या मार्गावरून नियमित प्रवास करणारे वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.
पंधरा वर्षांपासून सुरू असणार्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आजही संथगतीने सुरू आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे येणार्या गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास यंदाही खड्ड्यातूनच होणार असल्याने गणेशभक्तांमध्ये सरकारसह प्रशासनाबाबत नाराजी आहे. गणेशोत्सवाला जवळपास एक महिना उरला असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील अपुर्या अवस्थेत असलेला रस्ता तसेच खड्डे तातडीने भरण्यात यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले असून त्यानुसार राज्य सरकारने महामार्गावरील सर्व खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरण्यात यावेत, असे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना सांगितले आहे.
चाकरमान्याच्या प्रवासाची दरवर्षी होणारी गैरसोय लक्षात घेत रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी, गंभीर दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकार्यांना कामात हलगर्जी केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. खड्ड्यामुळे होणार्या अपघातात कोणी मृत्युमुखी पडल्यास संबंधित अधिकार्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. जिल्हाधिकार्यांनी काही दिवसांपूर्वीच या मार्गाची पाहणी केली, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. अपूर्णावस्थेत असलेल्या महामार्गावर दररोज अपघात घडत असून याचे कोणतेही सोयरसुतक प्रशासनाला राहिले नाही. पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तर पेणपासून पुढे रोहा-कोलाडपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुसळधार पावसाने खड्डे अधिक वाढल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.
नागोठणे ते कशेडी घाटरस्त्यावर सात ठिकाणे दरडप्रवण आहेत. सुकेळी, टोल, दासगाव, केंबुर्ली, नडगाव, धामणदिवी, चोलई अशी दरडप्रवण ठिकाणे आहेत. महाड आणि पोलादपूर तालुक्यात दरडप्रवण क्षेत्र अधिक आहेत. या दोन तालुक्यांमध्ये 2005 पासून दरडी कोसळण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे दरडी रस्त्यावर येण्याची भीती अधिक आहे. दासगाव खिंडीत तर दोन्ही बाजूला कातळ फोडून रस्ता रुंद करण्यात आला आहे. या डोंगरावरून केव्हाही भला मोठा दगड येऊन गाडीवर कोसळेल, अशी भीती चालकांना वाटते. काही ठिकाणी लेनमध्ये माती आली आहे. त्यामुळे वाहने अनियंत्रित होण्याचे प्रकार वाढले आहेत.