ज्योतीचा विदर्भ ते पॅरिस थक्क करणारा प्रवास
। पॅरिस । वृत्तसंस्था ।
पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत गुरुवारी (दि.29) भारताकडून ज्योती गदेरिया सायकल ट्रॅकवर उतरली होती. ती ज्यावेळी सायकल ट्रॅकवर उतरली, त्याचवेळी तिच्या नावावर एक मोठा विक्रम झाला. ती पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणारी भारताची पहिलीच सायकलिस्ट ठरली आहे. यापूर्वी अशी कामगिरी भारताकडून कोणालाच करता आली नव्हती. ती गुरुवारी पॅरा ट्रॅकच्या महिलांच्या 1-3 3 हजार मीटर प्रकारात सहभागी झाली होती. परंतु, ती 10 व्या क्रमांकावर राहिल्यामुळे तिला पदकापासून दूर रहावे लागले. परंतु, असे असले तरी तिने या स्पर्धेत सहभागी होणेच मोठी गोष्ट आहे. दरम्यान, ती पॅरालिम्पिक स्पर्धेत पॅरा-रोड सायकलिंग प्रकारातही सहभागी होणार आहे. तिच्यासह यंदा सायलिंगमध्ये हैदराबादचा शेख अर्शदही पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेत खेळणार आहे.
ज्योती गदेरिया महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील डोंगरगावमधील असून शेती हा तिच्या कुटुंबाचा मुख्य व्यावसाय आहे. तिला लहानपणापासूनच खेळात रस होता. ती उत्तम कबड्डी खेळायची. परंतु, 2016 साली तिचा गंभीर अपघात झाला. या अपघातात तिने तिचा डावा पाय गमावला. या अपघाताचा आघात तिच्या मनावर झाल्याने ती दोन वर्षे नैराश्यात होती. पण हळुहळू यातून सावरत तिने सायकल चालवण्यास सुरुवात केली.
ज्योती गदेरिया सायकल चालविता चालविता यातच करियर करायचे ठरवले. याआधी तिने पॅरा रोइंगमध्येही प्रयत्न केले होते. तिने त्यातही 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक पटकावले होते. पंरतु, तिने नंतर सायकलिंगलाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यात ज्योतीने अनेक आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. तसेच, हैदराबादमधील आदित्य मेहता फाऊंडेशनच्या मदतीमुळे तिने हैदराबादमध्ये सरावाला सुरुवात केली. त्यांनी ज्योतीची ट्रेनिंगसह सर्वच जबाबदारी उचलली. ती आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची प्रतिभा सिद्ध करत असाताना तिने 2022 मध्ये पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. या यशासह तिने पॅरिस पॅरालिम्पिकची पात्रताही मिळवली. त्यानंतर आता ती पॅरिसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहे.