। धुळे । प्रतिनिधी ।
नदीपात्रात बुडून बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. ही घटना बुधवारी (दि. 02) सकाळच्या सुमारास घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. सर्वपित्री अमावस्यानिमित्त गावाजवळच असलेल्या तापी नदीपात्रात दोघे बहिण-भाऊ हे बेल पत्र टाकण्यासाठी गेले होते. या नदीपात्राजवळ उत्कर्ष रमेश पाटील (13) याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याची बहीण वैष्णवी सुरेश पाटील (17) हिने नदीपात्राकडे धाव घेतली. मात्र, भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्याचा अंदाज न आल्याने तीदेखील पाण्यात बुडाली. नदीपात्रात दोघे चिमुकले बुडत असल्याचे पाहून सदर ठिकाणी वैष्णवीच्या काकांनीदेखील दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाणी जास्त असल्याने त्या दोघांना वाचण्यात त्यांना अपयश आले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत शोधकार्य सुरु केले असता घटनेच्या एक तासानंतर उत्कर्ष आणि वैष्णवी या दोघांचा नदीपात्रात मृतदेह आढळून आला.