1976 आदिवासी बांधवांना मिळणार रोजगार
| पाली | वार्ताहर |
वनांचे संरक्षण, संवर्धन व शाश्वत व्यवस्थापणातून स्थानिक आदिम आदिवासी लोक समुदायांना शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या अंतर्गत मंजूर वन तलावासाठी 5 लाख 28 हजार 908 रुपये इतका निधी मंजूर झाला असून या कार्यक्रमांतर्गत 1976 इतक्या लोकांना रोजगार मिळणार आहे.
सुधागड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिवे येथील सामूहिक वनहक्क मान्यता प्राप्त वन क्षेत्र, कंपार्टमेंट नंबर 651 मध्ये मजरे जांभूळपाडा आदिवासी वाडीतील सर्व कुटुंबांना गुरुवार (दि.4) पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना सुरुवात झाली. या कामांतर्गत मौजे मजरे जांभूळपाडा येथील आदिम आदिवासी लोकसमुदायांना शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. मजरे जांभूळपाडा या गावला 2019 साली काँपार्टमेंट नंबर 651 मध्ये एकूण 139.5 एकर इतक्या वन क्षेत्रावर वनहक्क कायदा 2006 चे कलम 3(1) अंतर्गत सामूहिक वनहक्क अधिकार मान्यता प्राप्त झाले आहेत.
या सामूहिक वनहक्क क्षेत्राच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी सबंधित सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा व वन विभाग, सुधागड पाली यांनी संयुक्तरित्या सूक्ष्म नियोजन केले होते. या सूक्ष्म नियोजनाची अंमलबजावणी करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामे प्रस्तावित करण्यात आली होती. उपवनसंरक्षक, अलिबाग राहुल पाटील यांनी या गावला भेट देऊन स्थानिक आदिम आदिवासी लोक समुदायाच्या स्थलांतराची व वन व्यवस्थापनासाठी तयार केलेल्या सूक्ष्म नियोजनाचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला होता. प्रस्तावित कामे ही वनीकरणाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण ठरणार असल्याने व स्थानिक आदिवासी लोक समुदायातील नागरिकांचे स्थलांतर कायमचे थांबवण्यासाठी प्रस्तावित सर्व कामांना तत्काळ तांत्रिक मंजुरी देण्याचे निर्देश उपवनसंरक्षक यांनी सबंधित वन अधिकारी व कर्मचार्यांना दिले होते. सामूहिक वनहक्क वन क्षेत्रात मंजूर वन तळे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले.
यावेळी सुधागड तालुक्याचे वन प्रिकहेटर अधिकारी दादासाहेब कुकडे, सरपंच रोहिदास साजेकर, वनपाल मनोज साळवी, संकेत गायकवाड, वनरक्षक विनोद चव्हाण, कार्यक्रम व अभियान प्रमुख, वातावरण फाऊंडेशन राहुल सावंत, अंकुश लोणकर, शिवाजी हिरडे, रमेश साखरे, तालुका समन्वयक, वातावरण फाऊंडेशन व सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडाचे सदस्य उपस्थित होते.
राज्यातील पहिले गाव अनुसूचित क्षेत्र लागू नसलेल्या सामूहिक वनहक्क मान्यताप्राप्त वन क्षेत्रात नरेगा अंतर्गत काम सुरू होणारे मजरे जांभूळपाडा हे महाराष्ट्रातील कदाचित पहिले गाव असावे. हे विशेष करून लक्षात घेण्यासारखे आहे. असे वातावरण फाऊंडेशनचे कार्यक्रम व अभियान प्रमुख राहुल सावंत म्हणाले.
कोट्यावधीच्या कामांना मंजुरी या प्रस्तावित कामांतर्गत वन तलाव बांधणे, वृक्ष लागवड करणे, अनघड दगडी नालाबांध बांधणे व नर्सरी उभारण्यासाठी एकुण 2479392 इतक्या निधीच्या कामांना तंत्रित तसेच प्रशाकीय मंजुरी देण्यात आली असून या अंतर्गत 8242 इतक्या मनुष्यांना दिवसांचा रोजागर निर्माण होणार आहे.
रोजगार हमी योजने अंतर्गत कामे कशाला करता ते तुम्हाला परवडणार नाही, ही कामे कधी मंजूर होणार नाहीत, या सगळ्या भुलथपा आहेत असे सांगून आम्हा आमच्या गावातून धंद्यासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न अनेक ठेकेदारांनी केला. मात्र, आम्हाला राहुल पाटील यांच्यावर विश्वास होता. आणि आज तो सिद्धाही झाला. आम्ही त्यांचे आभार मानतो असे मत भारती पवार, सदस्य सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा यांनी व्यक्त केले.
वनसंरक्षण व शाश्वत वन व्यवस्थापनाचे धेय्य स्थानिक आदिवासी लोक समुदायाच्या सक्रिय सहभागातून गाठता येणे शक्य आहे. त्यासाठी आदिवासी लोकसमुदायांना गावालगतच्या वन क्षेत्रात वनव्यवस्थापनाच्या अनुषंगाने आवश्यक असणार्या कामाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मागील वर्षी नागरिकांना सामूहिक वनहक्क क्षेत्रामध्ये शाश्वत रोजगार निर्माण करून देण्याचे आश्वासन दिले. त्या आश्वासनावर येथील नागरिकांनी तब्बल एक वर्ष विश्वास ठेवला. एक वर्षाचा कालावधी खूप मोठा असतो. आज अखेर या नागरिकांना वन व्यवस्थापनाच्या माध्यमातून रोजगार सुरू होतोय ही मनस्वी आनंदाची बाब आहे. मी वातावरण फाऊंडेशन व सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा यांना शुभेच्छा देतो.
– राहुल पाटील, उपवनसंरक्षक, अलिबाग, रायगड
वनांचे रक्षण करणे हे वनांवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असणार्या आदिम आदिवासी लोक समुदायाची सांस्कृतिक परंपरा आहे. पिढ्या दर पिढ्या या समुदायाने वनांचे रक्षण केले आहे. कालपर्यंत स्थानिक जागेवर रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध नसल्यामुळे या समुदायाला गरजेपोटी स्थलांतर करावे लागत होते. स्थलांतरात उत्पन्नाच्या ऐवजी कर्जबाजारीपणाच वाट्याला येत होता. मात्र रोजगार हमी योजनेतून वन संरक्षण व व्यवस्थापनाच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. स्थलांतराची ही शृंखला संपण्याची ही निर्णायक वेळ आहे.
– राहुल सावंत, कार्यक्रम व अभियान प्रमुख, वातावरण फाऊंडेशन
सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा ही आमची समिती वन रक्षणाच्या अनुषंगाने निश्चित आदर्शवत पायंडा पडणार आहे. त्यामुळे या मोहिमेत ग्रामपंचायत पातळीवर जी काही मदत या समितीला लागणार आहे, ती सर्वोतपरी मदत करायला आमची ग्रामपंचायत सज्ज आहे. वन रक्षणाच्या मोहिमेत इतर ग्रामपंचायतींनीही सक्रिय सहभाग घ्यायला हवा.
– रोहिदास साजेकर, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत चिवे