अधिकार्यांची भेट घेऊन तातडीने पाणी प्रश्न सोडविण्याची सूचना
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून ऐन सणासुदीमध्ये पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्याकडे नगरपरिषद प्रशासनकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याने माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करीत संबंधित विभागातील अधिकार्यांची भेट घेतली. पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावून पाणी पूर्ववत चालू करून द्या, अशी सूचना केली.
अलिबाग नगरपरिषदेवर गेल्या अडीच वर्षापासून प्रशासनाच्या भरोवश्यावर कारभार चालत आहे. सध्या पेणचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याकडे अलिबाग नगरपरिषदेचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवरात्रौत्सव सुरु आहे. महिला वर्ग हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करीत आहेत. परंतु सणासुदीत अलिबाग शहरातील काही भागांमध्ये दहा दिवसांपासून पाणी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. वारंवार नगरपरिषद प्रशासनाला सांगूनदेखील त्यांच्याकडून योग्य ती दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
ही बाब अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या निदर्शनास आली. शहरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी स्वतः बुधवारी अलिबाग नगरपरिषदेला भेट दिली.
तेथील संबंधित विभागातील अधिकार्यांची भेट घेऊन पाण्याच्या प्रश्नाबाबत माहिती घेतली. त्यांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत चालू करावा. जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करण्यात यावा अशी सूचना संबंधितांना देण्यात आली.
पाण्याची योजना लाल फितीत
केंद्र सरकार पुरस्कृत अमृत 2.0 अंतर्गत अलिबाग शहरासाठी सुधारित पाणीपुरवठा योजना प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. भविष्यातील पुढील 30 वर्षाच्या शहराच्या पाण्याच्या मागणीनुसार सुमारे 66 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र अजूनही हा प्रस्ताव शासनाच्या लाल फितीत अडकून असल्याचे चित्र आहे.