तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी
| अलिबाग | प्रतिनिधी |
ऐन मासेमारीच्या हंगामात अवकाळी पाऊस कोसळला. या पावसात मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले. मोठी वित्तहानी झाली आहे. त्यामुळे मच्छिमार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मच्छिमारांना द्यावी, अशी मागणी श्री महालक्ष्मी मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन कृष्णा गिदी यांनी केली. याबाबतचे निवेदन सोमवारी मत्स्यविभागाचे सहाय्यक आयुक्तांना दिले आहे.
जून महिन्यापासून पावसाळ्यात मासेमारीला बंदी घातली जाते. त्यामुळे मेअखेरपर्यंत समुद्रात मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. जवळा व इतर मासळी जाळ्यात आल्यावर ती सुकविणे, साफ करणे, त्यानंतर बाजारात विक्रीसाठी नेणे, अशी अनेक प्रकारची कामे या कालावधीत केली जातात. मात्र, यावर्षी सात मेपासून अवकाळी पावसाने सुरूवात केली. वादळी वाऱ्यामुळे मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली. 26 व 27 मे रोजी अतिवृष्टी झाली. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस जिल्ह्यात कोसळला. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. परिणामी, घरातील अन्नधान्य, मसाले व इतर पदार्थ पाण्यात भिजून मोठी हानी झाली. ओला जवळा सुकवण्यासाठी ओट्यावर पसरला होता. मात्र, पावसामुळे जवळा पूर्णतः भिजून गेला. काही ठिकाणी जवळा पाण्यात वाहून गेला. मे महिन्यामध्ये वीस दिवसांत मासेमारी करण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे मच्छिमारांचे खूप नुकसान झाले आहे. मासेमारीच्या हंगामात मासेमारीला बंदी घातल्याने मच्छिमारांचे प्रचंड नुकसान झाले. मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ मच्छिमारांवर आली.
राज्य शासनाने मच्छिमारांना कृषीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे सरकारने अटी-शर्तीच्या नियमाप्रमाणे पंचनामे करून मच्छिमारांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी श्री महालक्ष्मी मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन कृष्णा गिदी यांनी केली. याबाबत सोमवारी (दि. 2) मत्स्यव्यवसाय विभागाचे रायगड जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त यांना निवेदन दिले. निवेदनाद्वारे केलेल्या मागणीचा विचार करून मत्स्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी पंचनामे करून शासनाकडे योग्य ती शिफारस करून मच्छिमारांना झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळवून द्यावा, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी, मच्छिमारांना न्याय द्या : चित्रलेखा पाटील
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी, मच्छिमारांचे खूप मोठे नुकसान झाले. मासळी पावसाच्या पाण्यात भिजल्याने मोठी हानी झाली. उन्हाळी भातपिकांसह फळपिकांनाही अवकाळीचा फटका बसला. अनेक घरांची पडझड झाली. काही घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य व इतर खाद्यपदार्थ, वस्तू भिजून नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकरी, मच्छिमार यांना नुकसानभरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी शेकाप राज्य मीडिया सेल अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे.