86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
| मुंबई | प्रतिनिधी |
भारतमातेचा सच्चा सुपुत्र, सहृदयी उद्योजक, प्रत्येक देशवासियांच्या काळजातला ‘भारतरत्न’ उद्योजक, टाटा उद्योग समूहाचे अध्वर्यू, पद्मविभूषण रतन टाटा यांचे 86 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी (दि. 9) त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारताने एक अनमोल ‘रत्न’ गमावले असून, उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच राज्यात गुरुवारी (दि. 10) एक दिवसाचा दुखवटा जाहीर करुन सर्व शासकीय कार्यक्रमही रद्द करण्यात आले.
रतन टाटा यांच्या जाण्याने भारतासह जगभरातील उद्योगजगतावर शोककळा पसरली आहे. मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला, अशीच भावना प्रत्येक भारतीय व्यक्त करत आहे. रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात वरळी येथील पारशी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. 1937 मध्ये मुंबईत जन्म झालेले रतन टाटा हे नाव भारताच्या घराघरांत विश्वासाचे प्रतीक म्हणून घेतले जाते. त्यांच्या निधनाने उद्योगजगताचा लखलखता ध्रुवतारा निखळून पडला आणि ऐन सणासुदीच्या दिवसांत उद्योगजगत शोकाकुल झाले.
गेल्या सोमवारी पहाटे रक्तदाब कमी झाल्याने रतन टाटांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबद्दल सोशल मीडियावर चिंता व्यक्त होऊ लागली आणि रुग्णालयाकडून कोणतेही निवेदन येत नसल्याने प्रत्येकाच्या मनात काहूर उठले होते. ते लक्षात घेऊन स्वत: रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामसह सामाजिक माध्यमांवर पोस्ट शेअर करत रतन टाटा यांनी आपण ठणठणीत असल्याचे सांगितले होते. वयोमानानुसार वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल झालो असून, काळजीचे कारण नाही, असे आश्वस्त करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनदेखील त्यांनी केले होते. त्यानंतर मात्र त्यांच्याकडून कोणतीही पोस्ट आलेली नाही. आपली तब्येत चांगली आहे, हे सांगणारी त्यांची पोस्ट शेवटची ठरली. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस टाटा समूहाकडून किंवा ब्रिच कँडी रुग्णालयाकडूनही कुठलीच माहिती दिली गेली नव्हती. त्यातच बुधवारी ‘रॉयटर’सारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने रतन टाटांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी दिली आणि सर्वांच्याच मनात धस्स झाले. शंकेची पाल चुकचुकली. ही कुशंका दुर्दैवाने रात्रीच खरी ठरली. रतन टाटांचे देहावसान झाले ही बातमी जाहीर करताना टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन आपल्या निवेदनात म्हणतात, टाटा समूहासाठी रतन टाटा हे अध्यक्ष असण्याच्याही पलीकडे खूप काही होते. ते माझे पालनहार, मार्गदर्शक आणि मित्रही होते. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाचा जागतिक विस्तार झाला आणि स्वत:मध्ये आत्मसात केलेली नैतिक अनुकंपा जपत त्यांनी हे यश कमावले. समाजसेवेला समर्पित असलेल्या टाटांचा हा स्पर्श लाखो लोकांच्या आयुष्यालाही झाला. शिक्षणापासून आरोग्यसेवेपर्यंत अनेक पिढ्यांना लाभदायक ठरेल असे काम त्यांनी उभे केले. रतन टाटांनी अंगीकारलेली तत्त्वे समोर ठेवून आम्ही यापुढेही वाटचाल करत राहू, असा शब्दही चंद्रशेखरन यांनी दिला आहे.
रतन टाटा हे एक दूरदर्शी उद्योगपती, दयाळू आणि विलक्षण व्यक्ती होते. भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना त्यांनी स्थिर नेतृत्व प्रदान केले आहे. आणि समाजाच्या विकासासाठी आपली विनम्रता आणि दयाळूपणाचा आदर्श ठेवला.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी
रतन टाटा एक दूरदर्शी व्यक्ती होते. त्यांनी व्यवसाय आणि परोपकारात अमिट छाप सोडली आहे. त्यांच्या कुटुंबास आणि टाटा समुदायाप्रती माझी सहानुभूती राहील.
– राहुल गांधी
निखळ मानवता, सच्चे राष्ट्रप्रेम आणि उच्च कोटीची उद्योजकता यांचा दुमिळ मिलाफ अमूल्य असे रत्न म्हणता येईल. असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनामुळे जगाने गमावले आहे. भारतीयांच्या मनातील अढळ मानबिंदू अस्ताला जाणे धक्कादायक आहे.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे. त्यांचे जाणे, ही महाराष्ट्राची, देशाची मोठी हानी आहे.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
देशावर ओढवणार्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्त्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– शरद पवार
जीवनप्रवास..
1937- सुनू आणि नवल टाटा यांच्या घरी जन्म.
1955- वयाच्या 17 व्या वर्षी ते न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठात गेले.
1962- टाटा इंडस्ट्रीजमध्ये सहाय्यक म्हणून रुजू
1963- प्रशिक्षणासाठी लोह आणि पोलाद कंपनीत रुजू
1965- टिस्कोमध्ये तांत्रिक अधिकारी म्हणून रुजू
1970- काही काळ टीसीएस जॉईन केले.
1974- टाटा सन्समध्ये संचालक म्हणून रुजू
1981- टाटा इंडस्ट्रीजचे चेअरमन म्हणून नियुक्ती
1986-1989- एअर इंडियाचे चेअरमन म्हणून काम
1991- जेआरडी टाटा यांच्याकडून टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्सचे अध्यक्षपद
2000- पद्म भूषण
2000 नंतर- टेटली, कोरस, जेएलआर, जनरल केमिकल आणि देवू मोटर्सचे अधिग्रहण केले.
2008- पद्म विभूषण
2008- सर्वात लहान आणि स्वस्त कार टाटा नॅनो लाँच
डिसेंबर 2012- टाटा समूहात सुमारे 50 वर्षे राहिल्यानंतर टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडले. मानद अध्यक्ष म्हणून नियुक्त.