। अलिबाग । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड या सात विधानसभा मतदारसंघातील 24 लाख 68 हजार 120 मतदार 20 नोव्हेंबरला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये युवा, महिला व 85 वर्षांवरील मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, ही प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी मंगळवारी दिली.
गतवर्षी 2019 मध्ये 65 टक्के मतदान झाले. यंदा मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. यावर्षी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यात आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 51 हजार 612, 85 वर्षांपुढील 13 हजार 48 तसेच अनिवासी भारतीय 233 मतदार आहेत. जिल्ह्यातील दोन हजार 790 मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात बॅलेट युनिट सहा हजार 200, कंट्रोल युनिट तीन हजार 405 व व्हीव्ही पॅट तीन हजार 681 असे एकूण 13 हजार 286 मशीन असून, 17 हजार 2496 कर्मचार्यांची नियुक्ती केली जाणार आहे. 85 वर्षांवरील व 40 टक्के दिव्यांग व्यक्तींच्या घरी जाऊन मतदान करून घेतले जाणार आहे. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा करण्यात येणार आहे. तसेच सोशल मीडियावर ही करडी नजर ठेवली जाणार असल्याची माहिती जावळे यांनी दिली. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही ते म्हणाले.
विधानसभा मतदारावर दृष्टीक्षेप
मतदार संघ | पुरुष | महिला | तृतीय पंथ | एकूण मतदार |
पनवेल | 343511 | 302333 | 73 | 645917 |
कर्जत | 158394 | 158206 | 03 | 316603 |
उरण | 168712 | 167501 | 12 | 336225 |
पेण | 154029 | 152532 | 00 | 306561 |
अलिबाग | 149474 | 154122 | 01 | 303597 |
श्रीवर्धन | 129436 | 134485 | 00 | 263921 |
महाड | 146700 | 148596 | 00 | 295226 |
एकूण | 12,50256 | 12,17775 | 89 | 24,68120 |