। पालघर । प्रतिनिधी ।
मुंबई सांताक्रूझ येथे राहणार्या एका 20 वर्षीय तरुणीला 1 लाख 39 हजार रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी तीन मांत्रिकांच्या विरोधात नयानगर पोलीस ठाण्यात 14 ऑक्टोबर रोजी जादूटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सप्टेंबर मध्ये एका वृत्तपत्रामध्ये मांत्रिक मुस्ताक शाह याने दिलेली जाहिरात पाहून त्याच्याशी संपर्क साधला होता. या जाहिरातीत आर्थिक परिस्थीती सुधारण्यासाठी सक्षम असलेला आध्यात्मीक उपाय केला जाईल, असे म्हटले होते. तरुणीच्या घरची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने तिने या मांत्रिकावर विश्वास ठेवला. मांत्रिकाने एक पूजा घालावी लागेल, पुजे दरम्यान वेगवेगळ्या शक्ती बोलवाव्या लागणार असून त्यासाठी तुम्हाला मिठाई, फळ फुले, कपडे किंवा कोंबडा या प्राण्याचा बळी द्यावा लागणार, असे सांगितले. त्याला होकार दिल्याने शाह याने पूजेकरिता 64 हजार घेऊन येण्यास सांगितले. यानंतर 21 सप्टेंबर रोजी 32 हजार रोख रक्कम आणि 32 हजार रियाझ चौधरी या इसमाकडे पाठविण्यास सांगितले.
नंतर 22 सप्टेंबर रोजी पूजा संपन्न केली आहे. परंतु, तुमच्या घरावर कोणीतरी काहीतरी केलेले आहे, यासाटी 75 हजार रुपये लागणार आहेत. घाबरून जात तरूणीने आई वडिलांकडून वैयक्तिक काम आहे असे सांगून 75 हजार रुपये घेतले. 29 सप्टेंबर रोजी फोन करून सांगितले की, सर्व पुजा संपन्न झाल्या आहेत. सायंकाळी पुन्हा सांगितले की, काल घातलेल्या पुजेत विघ्न आले आहे. यामुळे यापुर्वी दोन म्हशींचा बळी दिला आहे. आणखी एका म्हशीचा बळी द्यावा लागेल. यानंतर तरूणीला आपली फसवणूक झाल्याचे समजले. यानंतर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







