। पालघर । प्रतिनिधी ।
गेल्या काही वर्षांपासून शेतकर्यांकडे असलेले पशुधन वाढण्याऐवजी त्याच्यात कमालीची घट होऊ लागली आहे. यामुळे भविष्यात येथील शेतीमध्ये सेंद्रिय खताचा अभाव तर दिसून येईलच, पण गावोगावी मिळणारे गायी, म्हैशीच्या दुधा ऐवजी अन्य देशांतून आयात होणार्या दुधाच्या पावडरचे प्रमाण वाढेल. यामुळे ही शेतकर्यांबरोबर सर्वांसाठी चिंतेची बाब ठरणार आहे.
देशाची अर्थिक राजधानी आणि जागतिक बाजारपेठ असलेल्या मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी कोटीच्या संख्येत पशुधन होते. या जिल्ह्यातून दररोज लाखो लिटर दूध मुंबई बाजारपेठेत जात होते. तर या जिल्ह्यातील संपूर्ण शेतीमध्ये येथील पशुपासुन मिळणार्या शेणखत वापर केला जात होता. या जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकवला जाणारा वाडा कोलम सेंद्रिय खतामुळेच नावारूपाला आला होता.
दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. पालघर जिल्ह्यात करण्यात आलेल्या सन 2012-13 च्या पशुगणनेमध्ये 3 लाख 96 हजार पशुधन (गाय, बैल, म्हैस, रेडा) होते. यानंतर सन 2017-18 मध्ये करण्यात आलेल्या पशुगणनेमध्ये ही संख्या 3 लाख 8 हजार 637 पर्यंत आली आहे. म्हणजेच पाच वर्षांत 87 हजारांहून अधिक पशुधन घटले आहे. सन 2022- 23 ची पशुगणना पूर्ण झालेली नाही. मात्र, या पशुगणनेमध्ये पशुधनाची कमालीची संख्या कमी झाली असून हा चिंतेचा विषय बनला आहे.
गायरानावर जमिनींवर अतिक्रमण
ब्रिटिश राजवटीत महसुल गावांची निर्मिती करताना संबंधित गावाच्या एकूण क्षेत्रापैकी 10 टक्के क्षेत्र हे गायरान (गुरचरण) क्षेत्र ठेवण्यात आले होते. या राखीव क्षेत्रावर गेल्या 75 वर्षांत अतिक्रमण होऊन ते फक्त दोन टक्के शिल्लक राहिले आहे. अनेक गावांमध्ये नव्याने वाढत असलेल्या वस्त्यांसाठी गावठाण उपलब्ध होत नसल्याने गावालगतच्या गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले दिसून येत आहे.
बैलगाडी, लाकडी नांगर हे कालबाह्य ठरल्याने तसेच नोकरी, व्यवसायाकडे लोकांचा कल वाढल्याने पशुधनाची संख्या कमी होऊ लागली आहे.
– डॉ. प्रकाश हसनालकर जिल्हा पशुधन अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर
दुधाळ जनावरांच्या वाढलेल्या किंमती व वाढलेले खाद्याचे दर यामुळे दुधाचा व्यवसाय शेतकर्यांसाठी फायदेशीर राहिलेला नाही. यामुळे दुधाळ जनावरांची संख्या कमी झाली.
– लक्ष्मण पाटील, शेतकरी, शिलोत्तर, ता. वाडा