। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील शिवतर येथे लघुपाटबंधारे योजनेंतर्गत बांधण्यात येत असलेल्या धरणासाठी आजी-माजी सैनिकांनी वडिलोपार्जित शेतजमिनी दिल्या आहेत, मात्र शासनाकडून अद्याप जागेचा मोबदला देण्यात आलेला नाही. या निषेधार्थ आजी-माजी सैनिकांनी प्रशासनाविरोधात दंड थोपटले असून, प्रजासत्ताकदिनी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
शिवतर येथील धरण बांधकाम अंतिम टप्प्यात असून, येत्या महिनाभरातच ते पूर्ण होणार आहे. शिवतरसह पंचक्रोशीतील गावांना पिण्यासाठी तसेच शेतीच्या कामासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आजी-माजी सैनिकांनी जमिनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूसंपादनाची प्रक्रिया करण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार झाले नव्हते. उपलब्ध व्यवहारापैकी पहिले दोन व्यवहार हे अधिकतम रक्कमेचे ग्राह्य धरावेत, असा शासकीय निकष असल्याने ते व्यवहार झाले आहेत. त्यांची सरासरी काढल्यास किमान 9 ते 10 हजार रुपयांचा प्रतिगुंठा दर देणे क्रमप्राप्त आहे, मात्र शासनाने या नियमाला हरताळ फासल्याचा आरोप करण्यात आला आहे.
येत्या काही दिवसांत धरणासाठी देण्यात आलेल्या जमिनीपोटी योग्य मोबदला न मिळाल्यास प्रजासत्ताकदिनी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा शिवतर ग्रामस्थ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष रोहिदास मोरे यांसह आजी-माजी सैनिकांनी दिला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले असून, ग्रामस्थांना तातडीने योग्य तो मोबदला मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.







