कर्जत नगरपरिषदेच्या वतीने सायकल रॅली संपन्न
। कर्जत । वार्ताहर ।
माझी वसुंधरा अभियानांतर्गत कर्जत नगरपरिषदेच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाचे संरक्षण म्हणजेच आपले संरक्षण हा संदेश देत कर्जतमध्ये जनजागृती करण्यात आली.
नगरपरिषद क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जागरूक नागरिक, स्वयंसेवी संस्था यांचा प्रतिसाद आणि सहभागाने माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत कर्जत नगरपरिषदेच्या वतीने दि.24 ऑक्टोबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणातून सकाळी नऊ वाजता सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी उमेश राऊत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक बळवंत घुमरे, बांधकाम विभागाचे लेखनिक रवींद्र लाड, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे, जितेंद्र गोसावी, मुकादम प्रदीप मोरे, विनोद पांडे आदी उपस्थित होते.
सायकल रॅलीत 30 सायकलस्वार सहभागी झाले होते. यामध्ये लहान श्रीईश तावरे-12, तर 63 वर्षांचे प्रकाश पटवर्धन यांचा समावेश होता. या रॅलीत नगरसेवक बळवंत घुमरे, तसेच नगरपरिषद कर्मचारी बाबूलाल उर्फ राजू वाघेला, प्रदीप हिरे, चेतन गायकवाड हे सहभागी झाले होते.
नगरसेवक बळवंत घुमरे यांनी सायकल चालवा आरोग्य मिळवा, पर्यावरणाचे संरक्षण म्हणजेच आपले संरक्षण असे सांगितले. ही रॅली कर्जत शहरात फिरली व पर्यावरणाबाबत जनजागृती केली.