। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा विविध कार्यकारी सहकारी संस्था व धान्य कोटी संस्था महासंघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड शनिवारी (दि. 7) झाली. या निवडीत निनाद विकास पाटील यांची अध्यक्षपदी, तर तुकाराम दामोदर पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी श्रीकांत पाटील यांनी जाहीर केले. अलिबागमधील चेंढरे येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमळाकर वाघमोडे, रायगड जिल्हा विविध कार्यकारी सहकारी संस्था व धान्य कोटी संस्था महासंघाचे संचालक तुकाराम गिजे, प्रकाश ठाकूर, मोहन धुमाळ, गोपीनाथ गंभे, सुमेध खैरे, गजानन झोरे, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, रायगड जिल्हा बँक स्टाफ सोसायटीचे अध्यक्ष सतीश देशमुख, मारुती सुरवसे आदी मान्यवर, पदाधिकारी, संचालक, कर्मचारी उपस्थित होते.
रायगड जिल्हा विविध कार्यकारी सहकारी संस्था व धान्य कोटी संस्था महासंघाच्या अध्यक्षपदासाठी निनाद पाटील यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी तुकाराम पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. अध्यासी अधिकारी श्रीकांत पाटील यांनी अर्जाची छाननी केली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक-एक अर्जच दाखल झाल्याने या छाननीत निनाद पाटील यांची अध्यक्षपदासाठी आणि तुकाराम पाटील यांची उपाध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच संचालक यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.