दानवे यांचा सरकारवर आरोप
। मुंबई । प्रतिनिधी ।
सर्वसामान्य जनता, शेतकरी यांची सरकारने दिशाभूल केली असून गुलाबी स्वप्नं दाखवत घोषणांचा मोठ्या प्रमाणात पाऊस सरकारने पाडल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या सरकारच्या काळात शेतकरी सुखी नाही. त्यामुळे राज्य सुखी सुखी नाही. शेतमालाला हमीभाव देऊ, असे पंतप्रधानांचे आश्वासन होते. मात्र, हमीभाव तर नाहीच पण उत्पादनाबाबत स्पष्टताही नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
मुंबई, पुणे शहरी भागात राहणार्या लोकांनी गावाकडील जमिनीवर विमा काढला आहे. देशाच्या व राज्याच्या कृषिमंत्री यांनी हा घोटाळा मान्य केला आहे. तांड्यावर 400 हेक्टर असताना 4 हजार हेक्टरचा विमा काढला गेला. परस्पर शेतकर्यांच्या नावावर विमा काढला जात आहे. सांगलीतील जत येथे एका शेतकर्याच्या नावावर पाच वेळा विमा उतरवला गेला. अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे हिंगोलीमध्ये गेल्या वर्षी एकाही शेतकर्याला पीकविमा मिळाला नाही. या जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी करत दानवे यांनी पीकविमा योजनेचा गैरवापर होत असल्याचे आरोप त्यांनी केले. तसेच, मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, कृषिपंप आदी योजनांच्या घोषणा सरकारने केल्या. मात्र, या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करणार्या शेतकर्यांचा अपेक्षा भंग होत असल्याचे दानवे म्हणाले.