रेल्वे प्रशासनासह खासदारांचे दुर्लक्ष
| खोपोली | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये खोपोली शहराचा अग्रक्रम आहे. शहरातील मुख्य रेल्वे स्थानक खोपोली असून, मध्य रेल्वेवरील हे शेवटचे स्थानक आहे. पनवेल शहरानंतर झपाट्याने विकसित होणारे खोपोली शहराची वाढती लोकसंख्या त्याप्रमाणे परिसरातील विविध कारखाने, विविध शासकीय कार्यालय, बँका, शाळा व महाविद्यालयामुळे खोपोली रेल्वे स्थानकात नेहमीच गर्दी असते. त्यामानाने खोपोली रेल्वे स्थानकात सुविधांचा अभाव असून, अनेक समस्यांचे डोंगर निर्माण झाले आहेत.
नुकताच पावसाळा सुरू झाल्यामुळे खोपोली परिसरात सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा रेल्वे स्थानकाच्या परिसरातील दृश्य पाहून पर्यटक नाराजी व्यक्त करतात. प्रशासनाची परिसरात मोठी जागा असून रेल्वे प्रशासनाने ठरवले मोकळा भाग सुशोभित करू शकते. परंतु, अधिकाऱ्यांची मानसिकता नसल्यामुळेच हे दृश्य दरवर्षी पहावयास मिळते. नगरपरिषदेचा हद्द आहे, तो रस्ता डांबरीकरण करण्यात आला. मात्र, रेल्वेच्या हद्दीतील रस्ता तसाच दगड मातीचा असल्याने पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यानंतर त्या ठिकाणी पाणीच पाणी व चिखलाचे साम्राज्य असते. तर, स्थानकातून बाहेर पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात दुर्गंधीमुळे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नाराजी आहे. तसेच, रेल्वे हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात टपऱ्या वाढल्याने या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
खोपोली प्रवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने रेल्वे प्रशासनासह मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनाही या सर्व समस्यांची वेळोवेळी कल्पना दिली आहे. परंतु, याकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल प्रवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.







