| अलिबाग | प्रतिनिधी |
अभिष्टचिंतन सोहळ्याला देशाचे नेते शरद पवार आल्याने कार्यकर्त्यांची उमेद वाढली आहे. कार्यकर्ते प्रोत्साहित झाले आहेत. त्यांच्याकडून मिळालेली विचारांची शिदोरी घेऊन प्रत्येक कार्यकर्ता नव्या उमेदीने कामाला लागेल, असा विश्वास आहे. देशामध्ये महिलांना सर्वच क्षेत्रात प्राधान्य देण्याबरोबरच जिल्हा परिषदेमध्ये महिलांना आरक्षण देण्याचे कामही शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार आज 85 वर्षांचे आहेत. आजही तेवढ्याच ताकदीने, उमेदीने ते काम करतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचा प्रयत्न कायम राहणार आहे. देशामध्ये शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांचे विचार अबाधित ठेवण्याची ताकद शरद पवार यांच्यामध्ये आहे. त्यांच्या मार्गदशर्नाखाली महाराष्ट्रातील राजकारणात बदल नक्की होणार आहे, असे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले.
सध्याची राजकीय परिस्थिती बिकट आहे. सर्वसामान्य माणूस मंत्रालयात जाऊ शकत नाही. निधी नसतानाही कामाची वर्क ऑर्डर काढली जात आहे. टक्केवारी घेऊन कामे केली जात आहेत. महाराष्ट्रात हे चित्र बदलण्याची ताकद फक्त शरद पवार यांच्यामध्ये आहे, असे जयंत पाटील म्हणाले. पक्षसंघटनेत आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. महिलांसह तरुणांना संघटनेत संधी देण्याचे काम केले आहे. 80 टक्के तरुणांना तालुका चिटणीस मंडळामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील असंख्य कार्यकर्त्यांनी विशेष करून तरुणवर्गाने हिंमत दिली. त्यांच्या जीवावरच अनेक संस्थांचे नेतृत्व केले जात आहे. आगामी काळात जिल्ह्यामध्ये एक वेगळी भूमिका घेऊन काम केले जाणार आहे. ज्यांना मोठे केले; मान-सन्मान दिला, तेच डोक्यावर बसले. त्यांनी गद्दारी केली. आता मात्र वेगळ्या भूमिकेतून काम केले जाणार आहे. फसवणाऱ्यांचा विचार करून पुनरावृत्ती होणार नाही, याचा विचार करण्याची गरज आहे. नाट्यगृह बनविताना प्रचंड मेहनत घेतली. कार्यकर्त्यांनी हिंमत वाढविली. त्यामुळेच आज सुसज्ज असे नाट्यगृह उभे राहिल्याचा आनंद आहे. ग्रामीण भागातील कलाकार, नाटककार यांना व्यासपीठ मिळावे, म्हणून अलिबागमध्ये पुन्हा जोमाने नाट्यगृह बांधले आहे. त्यांना पुढे नेण्याचे काम नाट्यगृह नक्की करेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांची अलोट गर्दी
शेकापचे नेते जयंत पाटील यांचा वाढदिवस म्हणजे जणूकाही उत्सव मानला जातो. सकाळपासून असंख्य कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वेश्वी येथील निवासस्थानी तसेच पीएनपी नाट्यगृहामध्ये कार्यकर्त्यांनी गर्दी केली. काहींनी फोनवर संपर्क साधून शुभेच्छा दिल्या. एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला. कार्यकर्त्यांची अलोट गर्दी नाट्यगृहासह परिसरात दिसून आली.
लढ्यांमध्ये पाटील कुटुंबियांचा वाटा मोठा : हर्षवर्धन सकपाळ
देशामध्ये औद्योगिक क्रांती झाली. राज्य, देशातील श्रमजीवी, कष्टकरी वर्ग काम करू लागला. परंतु, त्यांचा आर्थिक, सामाजिक विकास होण्यास अडचणी निर्माण झाल्या. शेतकरी, कामगारांना एकत्र करून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे विद्यापीठ म्हणजे पाटील कुटुंबिय आहे.

हे सर्व राज्याने अनेक वेळा पाहिले आहे. वेगवेगळ्या लढ्यांमध्ये पाटील कुटुंबियांचा वाटा मोलाचा राहिला आहे. ज्याप्रमाणे खिळ्यांद्वारे शब्द जुळविण्याचे काम पाटील यांनी केले आहे, त्याप्रमाणे बदलत्या लिपींना जुळवून महाराष्ट्रात एक वेगळी क्रांती पाटील कुटुंबिय करतील, असा विश्वास आहे. पाटील परिवारासोबत एक जिव्हाळ्याचे नाते आहे. जयंत पाटील यांनी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घेऊन अद्ययावत असे नाट्यगृह उभारले आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ म्हणाले.
जयंत पाटील एक लढवय्या नेता – निलेश लंके
दोन संघर्षयोद्धा एकाच व्यासपीठावर आहेत, ही गोष्ट खऱ्या अर्थाने अधोरेखित करण्यासारखी आहे. या योद्ध्यांनी अनेक कार्यकर्ते तयार केले. अनेकांना रोजगार देऊन अनेक कुटुंबियांना आर्थिक बळ दिले आहे. ‘जयंत’ या नावात सर्वकाही आहे. कधीही न डगमगणारे नेतृत्व, अपयशातून यशाचे शिखर गाठणारा नेता म्हणून जयंत पाटील यांची ख्याती आहे. जयंत पाटील स्वभावाने स्पष्टवक्ते आहेत. ते वरवर कठोर वाटत असले, तरी आतून मुलायम व प्रेमळ स्वभावाचे आहेत.

चुकणाऱ्यांना ओरडा देऊन सुधारण्यासाठी प्रोत्साहित करणे, चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक करणे, ही वृत्ती जयंत पाटील यांच्यामध्ये आहे. तरुणांना लाजवेल असे महान कार्य जयंत पाटील यांचे आहे. अनेकांना राजकीय व्यासपीठावर बसविण्याची क्षमता त्यांच्यात आहे. जयंत पाटील यांचा वाढदिवस तथा अभिष्टचिंतन सोहळा म्हणजे आज प्रत्येक कार्यकर्त्यासाठी दिवाळी आहे, असे बोलणे वावगे ठरणार नाही. हजारोंच्या संख्येने जमलेला जनसमुदाय हेच खरे उदाहरण आहे. राजकारणात चढ-उतार येत असतात. मात्र, त्यावर मात करीत पुन्हा लढा देण्याची ताकद फक्त जयंत पाटील यांच्यामध्येच आहे, असे खासदार निलेश लंके म्हणाले.












