| पनवेल | प्रतिनिधी |
रयत शिक्षण संस्थेमुळे ग्रामीण भागात ज्ञानाची गंगा पोहोचण्यास मदत झाली असून, याचे संपूर्ण श्रेय माजी आ. स्व. दत्तूशेठ पाटील यांचे असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस मा. आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

कोकणामध्ये पूर्वी विशिष्ट शिक्षण संस्थांची मक्तेदारी होती. ती मक्तेदारी मोडीत काढण्याचे काम माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांनी केली, असेही जयंत पाटील म्हणाले. दत्तूशेठ आणि दि.बा. पाटील यांच्या प्रयत्नांतून एन.डी. पाटील यांच्या मदतीने पनवेल, उरण तालुक्यांमध्ये रयत शिक्षण संस्थेची पाळेमुळे रोवली असल्याच्या आठवणींना जयंत पाटील यांनी उजाळा दिला. एक संकुल उभं केले, ते वाढवले आणि आज ते फोफवले असल्याचे पाटील म्हणाले.

आज या तालुक्यांमध्ये अनेक शिक्षण संस्था असतील, परंतु, आजही सर्वसामान्य माणसाला रयत शिक्षण संस्था आमची आहे, असे वाटते, एवढे मोठे काम या संस्थेच्या माध्यमातून झाल्याचे पाटील म्हणाले. दत्तूशेठ आमचे प्रमुख होते, त्यांनी कायम उत्तम मार्गदर्शन करुन माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवलं. सभागृहामध्ये शांत असत, पण जेव्हा बोलत तेव्हा मार्मिक बोलत, अशी आठवण जयंत पाटील यांनी सांगितली. ते पुढे म्हणाले, मी पवारसाहेबांचा खूप आभारी आहे, कारण त्यांनी या भागात रयत शिक्षण संस्थेची शाखा उभारण्यास मदत केली. त्यामुळे आज या संस्थेच्या माध्यमातून लाखो गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण घेणे सोपे झाले आहे. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात जर खऱ्या अर्थाने फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार रुजवायचे असतील, तर शरद पवार साहेबांपेक्षा दुसरा पर्याय नाही.
तात्यांच्या आदर्शावर काम करणार : बाळाराम पाटील
शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आ. स्व. दत्तूशेठ पाटील ऊर्फ तात्यांनी दिलेली कार्ये, संस्कृती सोडणार नाही, त्यांच्या आदर्शावर काम करण्याचा मी शिक्षण, सामाजिक क्षेत्रात निश्चितपणे प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन माजी आ. बाळाराम पाटील यांनी केले. अनेक राजकीय स्थित्यंतरे या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला पाहावी लागली. पण, तात्यांच्या आयुष्याचा सारीपाट सामोरा आणला की माझ्यासारखा कार्यकर्ता मनाने तयार होतो की, कितीही त्रास झाला तरी खचून जायचे नाही. नव्या जिद्दीने, उमेदीने काम करीत राहायचे, असा विश्वास बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला. शेतकरी कामगार पक्षाचे आमचे नेते जयंत पाटील आणि जिल्ह्यातील, तालुक्यातील कार्यकर्ते या संकटकाळी माझ्या पाठीशी उभे आहेत, याचमुळे मला काम करण्याची ऊर्जा मिळते, असेही पाटील म्हणाले.

ते म्हणाले की, विधिमंडळामध्ये अजितदादा, रोहितदादा यांच्यासोबत काम करता आलं, सुप्रियाताईंचं मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्यासोबत काम करता आलं. दोन पिढ्यांची ही वाटचाल निश्चितपणाने माझ्या आयुष्याला वेगळं कलाटणी देऊन गेली. आणि, कामाच्या बाबतीत आपण किती काम करू शकतो, याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपला दिनक्रम बघितल्यानंतर मिळाली. आपल्या आदर्शावर काम करण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी करतोय, असे बाळाराम पाटील यांनी शरद पवार यांच्यासमोर कबूल केले.






