रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंजुरी
| मुंबई | प्रतिनिधी |
रेल्वे प्रशासनाने ट्रेनच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दीत वाद होणे, महिला प्रवाशांच्या बाबतीत गैरप्रकार घडणे अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेने हे नवीन पाऊल उचलले आहे. सध्या प्रायोगिक स्वरूपात काही डब्यांत सीसीटीव्ही बसवले जाणार असून त्याचा सकारात्मक परिमाण सर्व डब्यांत टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये आणि 15000 इंजिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास होणार सुरक्षित होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ दोन कॅमेरे असतील. तसेच प्रत्येक डब्यामध्ये 4 डोम प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. एक पुढील बाजूस, एक मागच्या बाजूस आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक अशा प्रकारे प्रत्येक इंजिनमध्ये 6 सीसीटीव्ही असतील. तसेच, भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी नवे नियम लागू केले आहेत. आता प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही, याची माहिती ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधीच मिळणार आहे. यापूर्वी फक्त 4 तास आधी आरक्षण चार्ट तयार केला जात असे, त्यामुळे वेटिंग तिकिटधारकांना शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करावी लागत असे. मात्र आता नवीन निर्णयाचा लाखो रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे. हा नवा नियम लवकरच देशभर लागू केला जाणार आहे. तत्काळ तिकिट बुकिंगच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तात्काळ तिकिटे पूर्वीप्रमाणे प्रवासाच्या एक दिवस आधीच बुक करता येतील व त्यांची कन्फर्मेशन प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.
कमी प्रकाशातही स्पष्ट चित्रफिती मिळणार
प्रवाशांच्या गोपनीयतेचा विचार करताना, कॅमेरे केवळ डब्यांच्या सामान्य हालचाली क्षेत्रात (दरवाज्याजवळ) लावले जाणार आहेत. यामुळे डब्यांमधील खासगी भाग किंवा शयनक्षेत्र सुरक्षित राहील. रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे की हे सर्व कॅमेरे एसटीक्युसी प्रमाणित असतील आणि कमी प्रकाशातही स्पष्ट चित्रफिती मिळतील. अगदी 100 किमी प्रतितासह वेगाने धावणाऱ्या गाड्यांमध्येही हे सीसीटीव्ही उत्तमरीत्या काम करू शकतील.





