| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील व शेकाप कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आजच्या मेळाव्याला आलो. शेतकरी कामगार पक्षाची स्थापना 3 ऑगस्ट 1947 रोजी, म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेला शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्रातील एकमेव पक्ष आहे. इतकी वर्षे पक्ष ताठ मानेने टिकून आहे, हे आश्चर्य आहे. 1981 साली शिवसेनेचे पहिले अधिवेशन मुंबईत झाले होते. या अधिवेशानाला प्रमुख पाहुणे म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद डांगे आले होते. राजकारण आणि राजकारणी हे उदार होते. मोठ्या मनाचे होते. ते मोठे मन संकुचित होऊ लागले आहे. शिवसेनेच्या व्यासपीठावर डांगे येणे म्हणजे भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज येण्यासारखे होते. आज महाराष्ट्र वाचविण्यासाठी लाल ध्वजाच्या व्यासपीठावर दोन भगवे ध्वज आले आहेत, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (दि.2) नवीन पनवेलमधील माजी आमदार दत्तुशेठ पाटील सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी राज ठाकरे बोलत होते.







