| पनवेल | प्रतिनिधी |
माघी गणपतीला जाण्यासाठी शेजारी राहणाऱ्या महिलेकडून घेतलेले सोन्याचे गंठण परत न करता ते घेऊन शेजारीण पसार झाली. ही घटना खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी गंठण घेऊन पसार झालेल्या शेजारणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नेवाळी येथे राहणाऱ्या उज्ज्वला गोटीराम पाटील यांच्या शेजारी शीतल काथारा नावाची महिला राहते. शीतल काथारा हिला चिंधरण येथे माघी गणपतीला जायचे होते. त्यामुळे तिने उज्ज्वला पाटील हिच्याकडे असलेले सोन्याचे गंठण घालण्यासाठी मागितले होते. त्यावर उज्ज्वला यांनी तिला हे गंठण दिले होते. दोन दिवसांनी उज्ज्वला या गंठण मागण्यासाठी शीतलच्या घरी गेले असता तिने गंठण घेऊन येते, असे त्यांना सांगितले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या घरी परतल्या. मात्र, शीतल गंठण घेऊन आली नाही. त्यामुळे त्या काथारा हिच्या घरी गेले असता शीतल घरातून निघून गेल्याचे समजले. त्यावर उज्ज्वला यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.






