| कोर्लई | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील राजपुरी-खोकरी रस्त्यादरम्यान समुद्र किनाऱ्यालगतचा संरक्षक कठडा पावसाळ्यात कोसळल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक व प्रवासी वर्गातून केली जात आहे.
यंदा मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे राजपुरी-खोकरीदरम्यान समुद्र किनाऱ्यालगतचा संरक्षक कठडा कोसळला आहे. हा संरक्षक कठडा दुरूस्त करून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी राजपूरी ग्रामपंचायतीतर्फे मुरुडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आली होते; मात्र, अद्यापही या ठिकाणी कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने वेळप्रसंगी अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत कृषीवलच्या प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी, राजपुरी-खोकरी दरम्यान समुद्र किनाऱ्यालगतच्या संरक्षक कठडा बांधण्याचे वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असल्याचे सांगिले. परंतु, या कामासाठी अद्यापही निधी प्राप्त झाला नसल्याची माहिती समोर येत आहे. तरी याठिकाणी वेळप्रसंगी कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी, वाहनचालक व प्रवासी वर्गातून केली जात आहे.






