| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील तसेच देवकान्हे परिसरातील शेतकरी मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे चांगलेच आक्रमक झाले आहेत. ही मोकाट गुरे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असल्याने शेतकरी संतापले आहेत. तर, त्यांचा बंदोबस्तासाठी संबंधित खात्याला लवकरच लेखी निवेदन देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
देवकान्हे या भागात कालव्याला पाणी सोडण्यात आले असल्याने शेतकरी वर्गाने भातशेती, भाजी पाला व कलिंगड पीके घेतली आहेत. परंतु, मोकाट गुरांमुळे शेतकरी वर्गाचे नुकसान होत आहे. या गुरांचा योग्य तो बंदोबस्त करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तळवलीचे माजी सरपंच धनाजी लोखंडे, वसंतराव मरवडे, देवकान्हेचे माजी उपसरपंच बाळा भोईर, तळवलीचे सरपंच रवींद्र मरवडे, किशोर भोईर, डॉ. श्याम लोखंडे, धोंडू कचरे, संतोष भोईर, पांडुरंग गोसावी, तळवली येथील पशु वैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी डॉ. एस.पी. जाधव, महेश मरवडे, दयाराम मरवडे, दयाराम भोईर आदींसह तळवली तर्फे अष्टमी, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे व बाहे येथील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.







