| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील पुई स्टॉपजवळ दोन्ही बाजूच्या रस्त्याला गतिरोधक बसविण्यात आले आहेत. हे गतिरोधक वेगाची नशा अपघाताचे कारण ठरत आहेत. या गतिरोधकामुळे आठ दिवसात तीन ते चार अपघात झाले असून येथील अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी सिग्नल बसविण्यात यावे, अन्यथा या गतिरोधकामुळे एखाद्या प्रवाश्याचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील पुई स्टॉपजवळ अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बांधणे गरजेचे होते. गतिरोधक ही बांधण्यात आले. परंतु, रस्त्याला बांधण्यात आलेल्या गतिरोधकाची उंची योग्य असणे आवश्यक होती. तसेच गतिरोधक गोलाकार असावे. त्याची रुंदी 3.6 मीटर व उंची 6 ते 8 इंचपेक्षा जास्त नसावी, जेणेकरून वाहने आपटणार नाही याची दक्षता घेण्यात यायला पाहिजे होती. तसेच लांबून दिसण्यासाठी धोक्याची सूचना म्हणून 40 मीटर अगोदर सूचना दिसणारे फलक किंवा सिग्नल लावणे आवश्यक होते. परंतु, पुई स्टॉपजवळ रस्त्याला बांधण्यात आलेल्या गतिरोधकाची उंची जास्त असल्यामुळे व गतिरोधक एकमेकांना खेटून बांधण्यात आल्यामुळे या गतिरोधकावरून वाहने जाताना आदलली जात आहेत. यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच गतिरोधकाला लावण्यात आलेले पांढरे पट्टेदेखील वाहनांच्या घर्षणाने निघून गेले आहेत. शिवाय गतिरोधकाची उंची जास्त असल्यामुळे थोड्या प्रमाणात असणारे पांढरे पट्टे वाहनचालकांना दिसत नाही. यामुळे वाहन चालकांचा वाहनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जात असल्यामुळे अपघाताचे प्रमाणात वाढले आहे.
कोकणात होळीचा सणाचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात असून हा उत्सव चार दिवसावर येऊन ठेपला आहे. या उत्सवासाठी लाखो चाकरमानी गावाला येत असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी पुई स्टॉपजवळ अपघात टाळण्यासाठी दोन्ही बाजूच्या गतिरोधकाच्या अगोदर सिग्नल बसविणे आवश्यक आहे. तसेच रस्त्याला बांधण्यात आलेल्या गतिरोधकांची उंची कमी करून त्यावर पांढरे अथवा पिवळे पट्टे मारण्यात यावे. तसेच गतिरोधकाच्या 40 मीटर अगोदर सावधानतेचे फलक लावणे गरजेचे आहे.
– दिनकर सानप, सामाजिक कार्यकर्ते, पुई







