मुख्याधिकाऱ्यांच्या कारभारावर विरोधकांचा गंभीर आरोप
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान नगरपरिषद सध्या आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. प्रशासक राजवटीत काढण्यात आलेल्या विविध निविदांमुळे पालिकेची आर्थिक तिजोरी रिकामी झाली असून, शहरातील सार्वजनिक ठिकाणांचा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर येत आहे.
विरोधी पक्षातील नगरसेवक सचिन दाभेकर यांनी आरोप केला की, पालिकेची बँक खाती जवळपास शून्यावर आली आहेत. शहरातील घोडे तबेले, हुतात्मा भाई कोतवाल व्यायामशाळा तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी वीजपुरवठा बंद आहे. वीजबिल न भरल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दाभेकर यांनी पुढे सांगितले की, मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासक कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांची रायगड जिल्हाधिकारी व शासन स्तरावर चौकशी करण्यात यावी. आवश्यक नसलेल्या खर्चामुळे नगरपरिषद आर्थिक संकटात सापडल्याचा त्यांचा दावा आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तीवेतन देण्यासाठीही आर्थिक तरतूद नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणली. तसेच 38 लाख रुपये खर्चून 16 ई-शौचालये खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध होतो, मात्र वीजबिल भरण्यासाठी पैसे नसल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या चार वर्षांत नगरपरिषदेला आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणण्यात आल्याची टीका त्यांनी केली. पुढील दोन दिवसांत प्रलंबित वीजबिले भरून वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास मुख्याधिकाऱ्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही विरोधी पक्षाने दिला आहे. प्रशासक काळात घेतलेल्या सर्व निर्णयांची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या आरोपांमुळे माथेरान नगरपरिषदेत आर्थिक कारभाराबाबत चर्चेला उधाण आले असून, प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







