सोने-चांदी दागिन्यासह भांडी घेऊन फरार
। नेरळ । प्रतिनिधी ।
गावोगावी फिरून जुनी भांडी, नवीन भांडी करून देतो असे भासवून सासू सुनेने गावातील 15 जणांची फसवणूक केली. तर सोने चांदीचे दागिने देखील एकत्र करून सासू, सुन फरार झाली असून महिलांना लांखोंचा गंडा घातला आहे. नेरळ मोहाचीवाडी येथे राहणार्या महिला वर्गाची ही फसवणूक करण्यात आली आहे. तर याबाबत आता काही महिलांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत आपली फसवणूक करण्यात आल्याची तक्रार दाखल केली आहे. गावोगावी डोक्यावर भांडी घेऊन फिरणार्या या सासू, सुना सर्वप्रथम गावातील नागरिकांची चांगली ओळख पटवून जुने भांडी घेऊन त्यांना नवीन भांडी देत होत्या. त्या बदल्यात 30 ते 40 रुपये या फेरीवाल्या महिला त्या गावकरी महिलेंकडून घेत होत्या, सर्वप्रथम गावकर्यांना बोलण्यातच गार करून सासू, सून आपल्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडत असे, त्यानंतर दागिने छान आहेत असे भासवून फोटो काढून परत आणून देतो म्हणून सांगत. परंतु गावातील तब्बल 15 जणांकडून भांडी, सोने, चांदीचे दागिने एकत्र गोळा करून सासू – सून फरार झाल्या आहेत.