। रसायनी । प्रतिनिधी ।
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बस मागे घेत असताना पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीला बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील चावणे गावाच्या हद्दीत, कॅमलिन कंपनीच्या गेट क्रमांक 1 समोर घडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रहमान अब्दुल खान (61) रा. म्हाडा कॉलनी, गोवंडी, मुंबई हे कॅमलिन कंपनीच्या गेट क्रमांक 1 समोरून पायी चालत जात असताना बस चालक भोलानाथ सुजित लाल यादव (44) रा. आसूडगाव, ता. पनवेल हा बस मागे घेत होता. मात्र, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने बसचा जोरदार धक्का खान यांना बसला. या धडकेत बसचा पाठीमागील टायर त्यांच्या कमरेवरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अजय राठोड रा. वावेघर यांनी दिलेल्या तक्रारीवरून रसायनी पोलीस ठाण्यात बसचालक भोलानाथ यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश व्ही. पवार करीत आहेत.







