वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाय
। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
भाताण येथील अमेठी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू असताना, आजीवली ते भाताण या मार्गावर अचानक एक ट्रेलर रस्त्यात आडवा होऊन बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच नवीन पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश संकपाळ, पोलीस हवालदार संजय गावडे, ज्ञानेश्वर वाघ आणि जितेंद्र कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ जेसीबीच्या साहाय्याने बाजूला तात्पुरता कच्चा रस्ता तयार केला. तसेच भाताण व आजीवली परिसरातील रिक्षाचालकांना सहकार्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. यानंतर हायड्रा क्रेन बोलावून बंद पडलेला ट्रेलर बाजूला हटवण्यात आला आणि वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात आली.
या तत्पर आणि नियोजनबद्ध कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता आले. याबद्दल अमेठी इंजिनिअरिंग कॉलेजचे मॅनेजर गुरु बक्ष सिंग यांनी नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच विद्यार्थी व पालकांनीही पोलीस प्रशासनाच्या या मदतीचे कौतुक करत संबंधित अधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.







