आई-वडिलांशी भावनिक भेट
| पोलादपूर | प्रतिनिधी |
कोळसाभट्टी ठेकेदाराने ओलीस ठेवलेल्या दोन मुलींची तब्बल तीन वर्षांनंतर सुटका करण्यात आली असून, सर्वहारा जनआंदोलन संघटनेच्या प्रयत्नांमुळे त्यांची आई-वडिलांशी पुनर्भेट घडली आहे.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरवटणे येथील संतोष वाघमारे व त्यांच्या कुटुंबाला कोळसाभट्टी कामाच्या निमित्ताने कर्नाटकात नेण्यात आले होते. तेथे ठेकेदाराकडून मजुरी न देता वेठबिगारासारखे काम करून घेतले जात होते. या त्रासाला कंटाळून संतोष वाघमारे व त्यांची पत्नी सुनीता यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये तेथून पळ काढला. मात्र, त्यांच्या अनिता आणि पूजा या दोन मुलींना ठेकेदाराने स्वतःकडे ओलीस ठेवले होते.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सर्वहारा जनआंदोलन संघटनेने हस्तक्षेप केला. सुरुवातीला ठेकेदार अनिल चव्हाण याने मुली आपल्या ताब्यात असल्याचे नाकारले, मात्र संघटनेच्या इशाऱ्यानंतर त्याने अखेर ही बाब मान्य केली. त्यानंतर मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी दबाव वाढवण्यात आला. शेवटी रविवारी, 22 मार्च 2026 रोजी मंगळवेढा येथे अनिता व पूजा यांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे तब्बल तीन वर्षांनंतर या मुलींची आई-वडिलांशी भावनिक भेट घडली. या संपूर्ण कारवाईबाबत माहिती देताना सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी सांगितले की, संघटनेच्या प्रयत्नांमुळेच या मुलींची सुटका शक्य झाली.







