काँग्रेसकडून संघटन मजबूत करण्यावर भर
| रायगड | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ला रायगड जिल्ह्यात वेग आला असून, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध पातळ्यांवर हालचाली सुरू झाल्या आहेत. या अभियानासाठी डॉ. रागिनी नायक यांची रायगड जिल्ह्याच्या पर्यवेक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या अभियानात जिल्हाध्यक्ष म्हणून महेंद्र घरत, जिल्हा प्रभारी म्हणून प्रदीप राव तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मनीष गणोरे हे सक्रिय भूमिका बजावत आहेत.
डॉ. नायक यांनी सांगितले की, 27 मार्च 2026 पासून सुरू झालेले हे अभियान 19 एप्रिलपर्यंत चालणार असून, 21 एप्रिलपर्यंत सर्व निरीक्षकांचे अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे सादर केले जाणार आहेत. अहमदाबाद अधिवेशनानंतर देशभर संघटनात्मक बदल घडवून आणण्यासाठी काँग्रेसने ही व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश जिल्हा ते राज्य स्तरापर्यंत पक्ष संघटना अधिक पारदर्शक, सशक्त आणि जनतेशी थेट जोडलेली बनवणे हा आहे. यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी, तसेच, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस यांसारख्या फ्रंटल संघटनांशी संवाद साधून योग्य नेतृत्वाची निवड केली जाणार आहे.
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रा’चा उल्लेख करत डॉ. नायक म्हणाल्या की, जनतेशी थेट संपर्क साधणे हेच खरे राजकारण आहे. “नेतृत्वाने एसी खोलीत बसून नव्हे, तर जनतेमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातील निर्णय प्रक्रिया अधिक लोकाभिमुख करण्यात येत आहे. जिल्हाध्यक्षांची नियुक्ती, कार्यकारिणीचे पुनर्गठन, तसेच ब्लॉक व ग्राम स्तरावर समित्यांची उभारणी करून संघटन अधिक बळकट केले जाणार आहे. यावेळी डॉ. रागिनी नायक यांनी काँग्रेस पक्षात आवश्यक तेथे संघटनात्मक बदल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. दरम्यान, डॉ. नायक यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका करत रोजगार, महागाई, इंधन दर, स्मार्ट सिटी आणि बुलेट ट्रेन यांसारख्या मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला.
शेवटी त्यांनी पत्रकार व नागरिकांना आवाहन करत “लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी ‘संघटन सृजन अभियानात’ सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे सांगितले. रायगड जिल्ह्यात या अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असून, आगामी काळात त्याचे राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






