आदिवासी वाड्यांवर टंचाईचे संकट गडद
| उरण | प्रतिनिधी |
तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे या प्रमुख धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असून, सध्या दोन्ही धरणांमध्ये मिळून केवळ 47.65 टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत साठा तुलनेने जास्त असला तरी पुढील दोन ते अडीच महिने हा साठा पुरवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे.

उरण तालुक्यात वाढते औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या या धरणांमधून दररोज सुमारे 38 दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जात आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढत असून, उपलब्ध साठ्यावर त्याचा अतिरिक्त ताण पडत आहे.
रानसई धरणातील पाणी जुलैअखेरपर्यंत टिकवण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाला काटेकोर नियोजन करावे लागणार आहे, तर पुनाडे धरणाच्या पाण्याचे व्यवस्थापन लघुपाटबंधारे विभाग आणि पुनाडे आठ गाव पाणीपुरवठा समितीकडे आहे.

दरम्यान, उरण पंचायत समितीने पाणीटंचाई निवारण आराखडा तयार केला असला तरी प्रत्यक्षात रानसई आणि चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील सहा वाड्यांमध्ये पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. खैरकाटी, बंगल्याची वाडी, सागाचीवाडी, मार्गाची वाडी तसेच केळाचामाळ आणि चाँदायणी वाडी येथील नागरिकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
चिरनेर ग्रामपंचायतीने केळाचामाळ आणि चाँदायणी वाडी येथे तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबत माहिती देताना उरण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता रुपाली म्हात्रे यांनी परिस्थितीची गंभीरता अधोरेखित केली आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे उरण शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची नाराजीही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.






