। रायगड। जिल्हा प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी (एचएससी) परीक्षेचा निकाल उद्या, शनिवार, दि. 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. या निकालाकडे रायगड जिल्ह्यातील तब्बल 33 हजार 121 विद्यार्थ्यांचे लक्ष लागले असून, दुपारनंतर त्यांच्या भवितव्याचा मार्ग ठरणार आहे.
फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत पार पडलेल्या या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता होती. अखेर आज ही प्रतीक्षा संपणार असून, विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूकही कमी होणार आहे. बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. या परीक्षेनंतरच करिअरची दिशा ठरते आणि विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होते. यंदा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत परीक्षा झाली होती. उद्याचा दिवस रायगड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी निर्णायक ठरणार असून, त्यांच्या पुढील शिक्षण आणि करिअरची दिशा याच निकालावर अवलंबून असणार आहे.
ऑनलाईन मिळणार मार्कशीट निकालासोबतच विद्यार्थ्यांना तात्पुरती गुणपत्रिका आणि ई-मार्कशीट ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या निकाल पाहणे आणि गुणपत्रिका डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. गुणपत्रिका ही पुढील शिक्षण, प्रवेश प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने विद्यार्थ्यांनी ती सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. मात्र, ऑनलाईन मिळणारी मार्कशीट ही तात्पुरती असल्याने काही दिवसांनी मूळ गुणपत्रिका शाळा किंवा महाविद्यालयातून घ्यावी लागणार आहे.
ई-मार्कशीट डाऊनलोड करण्याची प्रक्रिया
अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा
‘Download/Verify HSC Marksheet’ पर्याय निवडा
परीक्षा वर्ष, सीट नंबर आणि तपशील भरा
‘Submit’वर क्लिक करा
मार्कशीट पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा
त्याचप्रमाणे पासिंग सर्टिफिकेटही डाऊनलोड करता येईल
विद्यार्थ्यांवर दृष्टीक्षेप
तालुके - विद्यार्थी
पनवेल - 12252
उरण -2147
खालापूर - 2446
कर्जत - 2748
सुधागड - 699
पेण - 2096
अलिबाग - 2671
मूरूड - 535
रोहा - 1752
माणगाव - 1728
तळा - 236
म्हसळा - 612
श्रीवर्धन - 749
महाड - 2185
पोलादपूर - 265
–—–
एकूण - 33,121
विद्यार्थ्यांना खालील अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
https://hscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com.परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व या माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.







