सात जोडपी विवाहबद्ध
| चिरनेर | प्रतिनिधी |
डोंबिवली पूर्व येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर मैदान, मानपाडा रोड, सागाव येथे आगरी समाज प्रबोधन संस्थेतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे सहावे वर्ष उत्साहात पार पडले. यंदा सात जोडपी विवाहबद्ध झाली असून, आतापर्यंत या उपक्रमातून एकूण 39 विवाह सोहळे यशस्वीरित्या संपन्न झाले आहेत.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक जोडप्याला एक लाख रुपयांचे मानधन दिले जाते. तसेच भविष्यातही कितीही विवाह झाले तरी ही मदत सुरूच राहील, अशी घोषणा आ. राजूदादा पाटील यांनी यावेळी केली. सामुदायिक विवाह सोहळा हा वाढत्या खर्चाला पर्याय ठरत असून, कर्ज काढून लग्न करण्याऐवजी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले. या सोहळ्यात वधू-वर आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी लग्नाची संपूर्ण व्यवस्था धार्मिक विधी, डेकोरेशन, भोजन, बँड-बाजा, वरातएकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते.
संस्थेचे कार्यकर्ते नोव्हेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करून वधू-वर मेळावे आयोजित करतात. परस्पर संमतीने जुळवलेल्या या विवाहांमुळे समाजात अनावश्यक खर्च टाळण्यास मदत होत आहे. यावर्षी सुशिक्षित तरुण-तरुणींनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. या सोहळ्याला विविध पक्षांचे नेते, समाजबांधव आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच या सामाजिक उपक्रमासाठी मदत करणाऱ्या दात्यांचे आयोजकांनी आभार मानले.







