| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
तहसील सेतू कार्यालयाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारस दाखला, उत्पन्न दाखला व इतर महत्त्वाचे दाखले मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शासनाच्या नियमानुसार सात ते दहा दिवसांत काही दाखले देणे बंधनकारक असताना पनवेलमध्ये मात्र वीस दिवसांनंतरही दाखले मिळत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सर्वर डाऊन असल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे बोलले जात आहे.
नागरिकांच्या मते, गेल्या 15 दिवसांपासून सेतू कार्यालयाचे पोर्टल बंद असल्याचे सांगितले जात आहे. अर्जदारांना ‘तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल’ असे सांगून वारंवार परत पाठवले जात असल्याने विद्यार्थी व पालकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः प्रवेश प्रक्रिया व शैक्षणिक कामांसाठी दाखल्यांची तातडीची गरज असताना होणारा हा विलंब विद्यार्थ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. दरम्यान, काही नागरिकांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, दलालामार्फत अर्ज केल्यास हेच दाखले तीन ते चार दिवसांत मिळत आहेत. तसेच येथील सेतू कार्यालयातील कर्मचारी महिला नागरिकांशी उर्मट भाषा वापरत वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटा तुमचे दाखले असून 15 ते 20 दिवसांनी भेटतील असे उत्तर देत आहेत. त्यामुळे कार्यालयातील पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होत असून, यामागे गैरप्रकार होत असल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन पोर्टल सुरू करावे, प्रलंबित दाखले लवकरात लवकर वितरित करावेत आणि दलालांच्या हस्तक्षेपाला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







