| पनवेल | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील मोरबे हे धरण नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालिकेचे आहे. परंतु, त्याची पाईपलाईन ही पनवेल महानगरपालिका हद्दीतून जात असून त्याचे वितरण केंद्र कामोठे या भागात आहे. या वितरण केंद्रातून किमान 30 एमएलडी पाणी पनवेल महानगरपालिकेला द्यावे, अशी मागणी वारंवार करण्यात आलेली आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री, आयुक्त नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका, विभागीय आयुक्त कोकण भवन, जिल्हाधिकारी, खासदार, व महापौर पनवेल महानगरपालिका यांना महाविकास आघाडीच्यावतीने निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी माहिती पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
या पत्रकार परिषदेला पनवेल महानगरपालिका सचिव प्रकाश म्हात्रे, नगरसेवक हरीश केणी, नगरसेवक तुषार पाटील, नगरसेविका मनीषा म्हात्रे, गटनेते व नगरसेवक केतन भगत, माजी नगरसेवक शंकर म्हात्रे व महानगरपालिका कार्यालयीन चिटणीस देवेंद्र मढवी आदी मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 29 गावे तसेच शहर परिसरामध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पनवेल परिसराचा विकास झपाट्याने होत असताना मात्र, पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून, पाणी प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांच्या न्याय हक्कासाठी व शासनाच्या लक्ष वेधण्यासाठी दि.17 मे रोजी सकाळी 11.00 वाजता कामोठे येथून नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा वितरण केंद्रावर जन मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे यांनी सांगितले.
जनमोर्चाच्या प्रमुख मागण्या
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात तातडीने 30 एमएलडी अतिरिक्त पाणी मंजूर करावे, 29 गावांसाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी जल योजना जाहीर करावी, पाणीपुरवठ्यातील अनियमीत्तता तातडीने थांबवावी, सिडको, पनवेल महानगरपालिका व नवी मुंबई महानगरपालिका या संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करण्यात यावी.






