लालचुटूक लिचीचा बाजारात थाट; चढ्या दरामुळे सर्वसामान्यांची पाठ
| पाली /बेणसे | धम्मशील सावंत |
कडाक्याच्या उन्हापासून दिलासा देण्यासाठी आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बाजारपेठेत विविध फळांची आवक सुरू झाली आहे. रसाळ आंबा आणि कलिंगडानंतर आता उन्हाळ्याचे खास आकर्षण असलेले लिची हे लालचटुक शाही फळ जिल्ह्यात दाखल झाले आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात या फळाचे दर गगनाला भिडले असून, चारशे रुपये प्रतिकिलो या दराने लिचीची विक्री होत आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला उत्तर भारतातून, विशेषतः बिहार आणि पश्चिम बंगालमधून लिचीची आवक होते. यंदा कडाक्याचे ऊन आणि बदलत्या हवामानाचा फटका लिची उत्पादनाला बसला आहे. परिणामी, बाजारपेठेत आवक कमी असल्याने लिचीचे भाव वधारलेले आहेत. सध्या स्थानिक बाजारपेठांमध्ये किरकोळ विक्रेते 400 रुपयांच्या घरात विक्री करत असल्याने हे फळ सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही.
लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने आणि व्हिटॅमिन सीमुळे उन्हाळ्यात या फळाला मोठी मागणी असते. रसाळ आणि गोड चवीमुळे बच्चेकंपनीसह मोठी माणसेही यावर ताव मारतात. मात्र, सध्याचे दर पाहता अनेक ग्राहक अर्धा किलो किंवा पाव किलोवरच समाधान मानत आहेत. येत्या काही दिवसांत आवक वाढल्यानंतर हे दर कमी होतील, अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.







