| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील 30 वर्षीय तरुण अभिजीत दीपके या तरुणाने सोशल मीडियावरून कॉक्रोच जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर या पक्षाच्या अकाऊंटला तरुणाईचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता. अवघ्या चार दिवसांत या पक्षाच्या इंस्टाग्राम अकाऊंटने फॉलोअर्सच्या बाबतीत भाजपच्या अधिकृत इंस्टाग्राम अकांऊटलाही मागे टाकले. त्यामुळे देशभर या पक्षाची चर्चा सुरू आहे. असे असतानाच आता या पक्षाचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या ट्विटर अकाऊंटला गेल्या चार दिवसांत दोन लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी फॉलो केले होते. गुरुवारी सकाळी कॉक्रोज पार्टीच्या इंस्टा हँडलने फॉलोअर्सच्या बाबतीत भाजपच्या अधिकृत हँडलला मागे टाकल्यानंतर संपूर्ण देशभरात त्याची जोरदार चर्चा झाली. दरम्यान, या पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी त्यांचे अधिकृत अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावादेखील गुरुवारी केला होता. त्यानंतर काही वेळातच पक्षाचे एक्स अकाऊंट सस्पेंड करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी देशातील तरुणांना उद्देशून झुरळ संबोधले होते. या संदर्भाने उपरोधिक स्वरूपात सदरील पक्षाची सोशल मीडियावर स्थापना झाली असून, तरुणांना ही कल्पना प्रचंड आवडली आहे. मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील असलेल्या अभिजीत दीपके याने हा पक्ष स्थापन केला आहे. या पक्षात सामील होण्यासाठी प्रमुख अट म्हणजे तुम्ही सुशिक्षित बेकार असला पाहिजे ही आहे.
दरम्यान, आम्ही या अकाऊंटवर कोणतीही चुकीची गोष्ट लिहिलेली नव्हती. आपण तर फक्त शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो. नीट पेपरफुटी झाल्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, हे आपण सांगत होतो. मात्र, त्यामुळे आता या लोकांनी आपलं अकाऊंट बंद केलं आहे. ही नेमकी कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? असा सवालही अभिजीत दीपके याने विचारला आहे. तसंच या पक्षाने जाहीर केलेल्या अजेंड्यातून सरकार आणि न्यायव्यवस्थेसह प्रसारमाध्यमांवरही निशाणा साधण्यात आला आहे.






