| रसायनी | प्रतिनिधी |
एप्रिल महिना सुरू झाल्यापासून रसायनी विभागात रात्री बे रात्री विजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मोहोपाडा व आसपासच्या परिसरातील विजपुरवठा वारंवार खंडीत झाल्याने दुकानदारांसह विज ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वीज ग्राहक संतप्त झाले आहेत. अचानक वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने विजेची मागणी वाढली आहे त्यातच उष्णता देखील प्रचंड जाणवू लागली आहे. मात्र दिवसातून अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. तसेच रात्रीच्या वेळेस देखील वीज गायब होत आहे. दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहक संतप्त झाले आहेत. रात्रीच्या वेळेस तरी अखंड विद्युत पुरवठा महावितरणाने द्यावा , अशी मागणी विज ग्राहकांसह, व्यापाऱ्यांकडून होत आहे.
यातच शुक्रवार सायंकाळी विजपुरवठा खंडीत झाला.त्यानंतर तासाभरातच मासळी बाजारासमोरील ट्रान्सफार्मा डिपी जळाली. डिपी जळताच राकेश खराडे यांनी रात्री 12:30 पर्यंत उपस्थित राहून महावितरणाशी संपर्क साधला. शनिवार दि 23 रोजी खराडे यांनी मोहोपाडा महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून महावितरण कर्मचाऱ्यांनसोबत दुपारपर्यंत उपस्थित राहीले. दरम्यान शनिवारी खराडे यांनी मोहोपाडा परिसरातील विजपुरवठा कायमचा मार्गी लावावा, कमी व्होल्टेज समस्या आदीसाठी निवेदन दिले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.







